Cotton Price : राज्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात शेती होते. कापसाची प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात लागवड पाहायला मिळते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कापूस या नगदी पिकावरच अवलंबून आहे. यंदा मात्र कापसाला अपेक्षित असा दर बाजारात मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
एकीकडे बाजारात कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली तर दुसरीकडे आता साठवणूक केलेल्या कापसात वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यामुळे साठवणूक केलेल्या कापसाच्या संपर्कात आल्यास शेतकऱ्यांना वेगवेगळे त्वचारोग होत आहेत. अंगावर पुरळ येत आहेत, खाज सुटत आहे परिणामी शेतकऱ्यांना घरात कापूस साठवणूक करून ठेवणे अशक्य बनत आहे.
शिवाय अधिक काळ कापूस साठवून ठेवल्यामुळे कापसाचे वजन कमी झाले आहे. कीटकांमुळे कापसाचा दर्जा देखील खालावत आहे. आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता साठवणूक केलेला कापूस विक्रीसाठी बाजारात दाखल केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. तज्ञ लोकांनी कापूस दर वाढीचा अंदाज बांधला आहे. कापूस वायद्यावरील बंदी या चालू महिन्यात शासनाच्या माध्यमातून हटवण्यात आली असल्याने दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
याशिवाय कापसाची आता बांगलादेशमध्ये निर्यात सुरळीतपणे सुरू झाली आहे. भविष्यात बांगलादेशमध्ये निर्यात वाढीची शक्यता देखील तयार झाली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कापसाचा सर्वात मोठा ग्राहक देश अर्थातच चीनने देखील भारताकडून कापूस खरेदी ची तयारी दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये कापूस खरेदीसाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय कापूस आयातीसाठी आता अकरा टक्के शुल्क देखील सरकारच्या माध्यमातून आकारला जात आहे. मध्यंतरी हे शुल्क सरकारने माफ केलं होतं. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात कापूस आयात होत होती. पण केंद्र शासनाकडून पुन्हा एकदा कापूस आयातीवर 11 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. यामुळे दर वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या कापसाला साडेसात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळत आहे. काही ठिकाणी आठ हजारापेक्षा अधिक भाव मिळत आहे, मात्र बोटावर मोजण्या इतक्याच एपीएमसी मध्ये हा दर आहे. दरम्यान, आता तज्ज्ञांनी दरवाढीचा अंदाज बांधला असल्याने येत्या काही दिवसात उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.