Law Of Property:- मालमत्ता हा खूप महत्वपूर्ण विषय असून तितकाच गुंतागुंतीचा देखील आहे. आपण जर कोर्टामधील बहुसंख्य वाद पाहिले तर ते प्रामुख्याने मालमत्तेच्या संबंधित आढळून येतात. यामध्ये मालमत्तेची वाटणी किंवा मालमत्तेचे असतात तर मुलांचे पालकांच्या प्रॉपर्टीवर असणारे अधिकार किंवा मुलांच्या प्रॉपर्टीवर पालकांचे अधिकार या व अशा कित्येक विषयांना धरून अशा प्रकारचे वाद उद्भवतात व कधी कधी हे वाद इतक्या टोकाला जातात की कोर्टाच्या दारात पोहोचतात.
भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये मालमत्तेच्या बाबतीत अनेक प्रकारचे कायदे आहेत व त्यानुसारच प्रॉपर्टीच्या बाबतीतली सगळी प्रक्रिया पार पाडते. आता आपल्याला माहित आहे की आई-वडिलांची जर मालमत्ता असेल तर त्यावर प्रामुख्याने मुलगा आणि मुलीचा हक्क असतो हे आपल्याला माहित आहे.
परंतु त्याउलट बघितले तर मुलांची जर प्रॉपर्टी असेल तर त्यावर पालकांचा हक्क असतो का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे व अशा परिस्थितीत पालक त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात का? हा प्रश्न साहजिकच पडतो. यामध्ये जर आपण बघितले तर काही ठराविक परिस्थितीमध्ये पालक त्यांच्या मुलांच्या मालमत्तवर दावा करू शकतात किंवा नाही? याबाबतची माहिती थोडक्यात बघू.
मुलांच्या संपत्तीवर आई-वडिलांचा अधिकार असतो का?
यामध्ये जर आपण भारतीय कायदा बघितला तर सामान्य परिस्थितीत पालकांना त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर दावा करण्याचा अधिकार नाही. परंतु काही विशेष परिस्थिती असेल तर पालक त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर मात्र दावा करू शकतात.
यामध्ये हिंदू उत्तराधिकार कायदा 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली होती व त्यानुसार जर बघितले तर मुलांच्या मालमत्तेवर पालकांचे हक्क या कायद्याच्या कलम 88 मध्ये नमूद केले गेले आहेत व त्यानुसार पालक त्यांच्या मुलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात किंवा दावा करू शकतात.
कोणत्या परिस्थितीमध्ये मुलांच्या संपत्तीवर पालकांना अधिकार सांगता येतो किंवा दावा करता येतो?
जर आपण प्रॉपर्टीच्या बाबतीत महत्त्वाचा असलेला हिंदू उत्तराधिकार कायदा बघितला तर त्यानुसार जर एखादा अपघात किंवा आजारपणामुळे मुलाचा अकाली मृत्यू झाला किंवा तो प्रौढ आणि अविवाहित असल्यास आणि त्याचा मृत्युपत्र न बनवता मृत्यू झाला तर पालक मुलांच्या मालमत्तेवर दावा सांगू शकतात किंवा त्यांना तसा अधिकार आहे.
यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की या परिस्थितीत देखील मुलाच्या मालमत्तेवर पालकांना पूर्ण अधिकार मिळेल असे नाही. उलट यामध्ये आई आणि वडील या दोघांचे देखील यामध्ये स्वतंत्र असे हक्क असतात.
प्रामुख्याने मुलाची मालमत्ता असेल तर आईला प्राधान्य दिले जाते असे कायदयामध्ये नमूद करण्यात आले आहे व आई अशा पद्धतीचा हक्क सांगताना पहिला वारसदार मानले जाते व दुसरा वारसदार म्हणून वडिलांचा विचार होतो.
परंतु या परिस्थितीमध्ये जर आई पहिल्या वारसांच्या यादीमध्ये नसेल तर साहजिकच मालमत्तेचा ताबा हा वडिलांना मिळतो व तसा अधिकार त्यांना असतो. कारण दुसरा वारस म्हणून त्यापेक्षा जास्त जण दावा करू शकतात व अशा परिस्थितीत इतर वारसांना वडिलांसह समान भागीदार मानले जाते.
मुलगा आणि मुलीच्या बाबतीत कायद्यात आहे स्वतंत्र तरतूद
हिंदू उत्तराधिकार कायदा बघितला तर त्यानुसार मुलाच्या प्रॉपर्टीवर पालकांचे हक्क देखील मुलांच्या नातेसंबंधावर अवलंबून असतो. म्हणजेच मुलगा असेल तर कायदा वेगळा पद्धतीने काम करतो आणि जर मुलगी असेल तर वेगळा कायदा यामध्ये धरला जातो.
मुलाच्या संपत्तीवर वारस म्हणून पहिले आई आणि दुसरे वारस म्हणून वडील यांना मान्यता दिली जाते. मात्र आईचं नसेल तर वडील आणि इतर वारसांमध्ये मालमत्तेचे विभाजन होते. परंतु मुलाचे जर लग्न झाले असेल आणि मृत्युपत्र लिहिले नसेल तर त्याच्या पत्नीला मालमत्तेवर हक्क मिळतो व अशा परिस्थितीत मात्र त्याची पत्नी पहिली वारस मानली जाते.
तसेच मुलगी असेल तर मात्र मालमत्ता प्रथम तिच्या मुलांना आणि नंतर पतीला दिली जाते. परंतु मुले नसतील तर पहिले पती आणि शेवटी पालकांमध्ये संपत्ती विभाजन होते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे मुलीच्या प्रॉपर्टीवर आई-वडिलांचा अधिकार हा शेवटचा असतो.