Farmer Success Story:- नोकरीपेक्षा शेती उत्तम असे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी म्हटले जायचे व ते तितके खरे देखील होते. परंतु कालांतराने परिस्थिती बदलत गेली व शेती काही अंशाने परवडेनाशी झाली व या कारणामुळे शेतीपासून अनेक जण दूर जाऊ लागले व तरुणाई तर शेतीमध्ये पाय ठेवायला तयार नव्हती अशी परिस्थिती उद्भवली व आताच्या परिस्थितीमध्ये शेतीपेक्षा नोकरी उत्तम असे म्हटले जाऊ लागले.
परंतु जर आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर नोकऱ्यांची उपलब्धता देखील खूपच कमी झाल्यामुळे देशामध्ये अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.नोकरी मिळणे कठीण झाल्यामुळे आता बरेच तरुण-तरुणी हे व्यवसायांकडे वळत आहेत व त्यातल्या त्यात शेतीकडे वळणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
अशाप्रकारे उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये आल्याने शेतीचे देखील रुपडे पालटले व शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहायला लागले व त्याचेच परिणीती म्हणून शेतीमध्ये देखील आता मोठी प्रगती झाली व आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येऊ लागल्याने कमीत कमी क्षेत्रात देखील शेतकरी आता लाखोच्या घरात उत्पन्न मिळवू लागले आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेल्या खजरी गावातील उच्चशिक्षित असलेले राहुल कुमार यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना आणि तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे. राहुल कुमार यांनी बीटेक आणि एमबीए पूर्ण केले व जवळपास पंधरा वर्षे एका पावर प्लांटमध्ये वार्षिक पंधरा लाख रुपये पॅकेजचे नोकरी करायला सुरुवात केली.
परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर खूप मोठे आघात झाले होते.त्यांचे वडील व मुलगा कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने हे जग सोडून गेले व त्यावेळी त्यांना खूप धक्का बसला. ही घटना त्यांना नोकरी सोडून शेतीत यायला कारणीभूत ठरली व त्यांनी नोकरी सोडली व 2018 मध्ये सेंद्रिय शेती करण्याच्या उद्देशाने शेतीत पाऊल ठेवले.
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करण्या अगोदर त्यांनी ही शेती पूर्णपणे समजून घेतली व त्याकरिता राज्य सरकारची मदतीने देशातील विविध संस्था आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असलेले गांडूळ खत,
जीवामृत सारखे इतर सेंद्रिय उत्पादने तयार करायला अगोदर शिकून घेतले व इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षित शेती आणि मशरूम उत्पादनासारखे आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून हा शेतीत अनोखी प्रगती केली आहे.
कसे आहे राहुल कुमार यांच्या शेतीचे स्वरूप?
राहुल यांच्याकडे जवळपास दहा एकर जमीन आहे व त्यामध्ये नाचणी तसेच हरभरा, मुग तसेच गहू, ज्वारी, बाजरी आणि इतर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. परंतु हे परंपरागत पिकांचे उत्पादन घेताना मात्र ते पूर्णपणे नैसर्गिक खते आणि सेंद्रिय पद्धतीचाच वापर करतात.
त्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनाचा दर्जा सुधारायला मदत होते. याशिवाय दुधाचे आणि मशरूमचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतात. त्यांनी ज्वारी, बाजरी, नाचणी,मूग, काळा गहू आणि इतर धान्याचा समावेश असलेले रसायनमुक्त नवरत्न पीठ तयार केले व हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश आहे.
रसायन मुक्त पीठ त्यांच्या सेंद्रिय प्रक्रिया युनिट मध्ये तयार केले जाते व ते ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर राहुल कुमार आज श्रीराम ऑरगॅनिक फार्मर्स ग्रुप ही कंपनी देखील चालवतात व विशेष म्हणजे परिसरातील 600 पेक्षा जास्त शेतकरी या कंपनीशी जोडले गेलेले आहेत.
या कंपनीच्या माध्यमातून राहुल कुमार इतर शेतकऱ्यांना देखील सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करायला प्रोत्साहित करतात. ते जेव्हा नोकरी करत होते तेव्हा त्यांना पंधरा लाख रुपये पॅकेज होते.
परंतु आज या शेती पद्धतीतून आणि शेती प्रक्रिया उद्योगातून जवळपास ते वर्षाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्तीची उलाढाल करत आहेत. यांची ही सगळी प्रक्रियायुक्त सेंद्रिय उत्पादने ते प्रामुख्याने नोएडा तसेच गुरुग्राम, पुणे व मुंबई इत्यादी शहरांमध्ये पाठवतात.
शेती क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी करण्यात आला आहे सन्मान
राहुल कुमार यांची शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया 2024 सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने देखील गौरवण्यात आले व 2022 मध्ये आग्रा येथे ऑरगॅनिक इंडिया पुरस्कार देखील मिळालेला आहे. इतकेच नाही तर 2023 मध्ये त्यांना मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सेंद्रिय शेती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.