Maharashtra New Expressway List :महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरवात केली आहे. खरं पाहता कोणत्याही विकसित प्रांतात तेथील दळणवळण व्यवस्था त्यां प्रांतातील विकासात मुख्य भूमिका बजावत असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात 5267 किलोमीटर लांबीचे महामार्गांचे जाळे विकसित केले जाणार आहे.
यामुळे शहरा-शहरांमध्ये तसेच जिल्हा-जिल्ह्यातील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएसआरडीसी कडून राज्यात 4217 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1050 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
MSRDC ने 4,217 किमी महामार्ग विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे. यापैकी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे 94 किमी बांधकाम आधीच पूर्ण झाल आहे, आणि नागपूर-पुणे समृद्धी महामार्ग पूर्णत्वाकडे आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून यातील पहिला टप्पा सुरु झाला आहे. या मार्गाचा नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाले आहे.
आता या समृद्धी महामार्गाचा शिल्लक राहिलेला भाग देखील लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. दरम्यान या महामार्गाचा 180 किमी जालना-नांदेड आणि 141 किमी नागपूर-गोंदिया महामार्गाने विस्तार केला जाणार आहे. तसेच 106 किमी लांबीचा गोंदिया-गडचिरोली आणि 156 किमीचा गडचिरोली-नागपूर महामार्ग समृद्धी विस्ताराचाचं एक भाग राहणार आहेत.
याशिवाय मुंबई आणि सिंधुदुर्ग हे ३१८ किमी लांबीच्या कोकण द्रुतगती मार्गाने जोडले जातील, तर विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग मुंबई महानगर प्रदेशात विकसित केला जाणार असून तो ९८ किमी लांबीचा असेल.
पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 168 किलोमीटरचा महामार्ग बांधण्यात येणार आहे. तसेच 760 किमीचा नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग आणि 180 किमीचा पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग या दोन्ही प्रकल्पांचा देखील प्रस्तावित महामार्गांमध्ये समावेश आहे, या दोन्हींच्या नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या आहेत.
तसेच मराठवाड्याच्या विकासासाठी 300 किमीचा शिरूर-बीड-लातूर राज्य सीमा महामार्ग प्रस्तावित आहे, तर नाशिक-धुळे-जळगाव-अमरावती-नागपूर हा 650 किमी लांबीच्या प्रस्तावित महामार्ग देखील याचा भाग आहे. प्रस्तावित प्रकल्पात 125 किमीचा औरंगाबाद-जळगाव महामार्ग आणि 240 किमीचा शेगाव-अकोला-नांदेड महामार्गाचाही समावेश आहे.
एमएसआरडीसी आता या महामार्गाच्या उभारणीसाठी सज्ज झाली आहे. कर्जवसुली आणि सरकारी निधीतून महामार्ग पूर्ण केले जाणार आहेत. 5,267 किमीपैकी 1,050 किमी महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडून केले जाणार असून विविध राज्यांमधून जाणारे महामार्ग महाराष्ट्राला जोडले जाणार आहेत.
त्यात औरंगाबाद-पुणे महामार्ग (270 किमी, राज्याचा भाग), सुरत ते चेन्नई महामार्ग (450 किमी, राज्याचा भाग), दिल्ली-मुंबई महामार्ग (110 किमी, राज्याचा भाग), आणि पुणे-बेंगलोर महामार्ग (220 किमी, राज्याचा भाग) याचा समावेश आहे.