Pune Ring Road:- पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंगरोड उभारणीचे काम हाती घेण्यात आलेले आहे व हे काम पूर्व आणि पश्चिम असे दोन भागात पूर्ण केले जाणार आहे.
यातील जर आपण पूर्व भागातील रिंगरोड पाहिला तर तो पाच तालुक्यातून जाणार असून या पाच तालुक्यात हवेली तालुक्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या भागातून जाणाऱ्या रिंगरोड करिता जे काही जमीन संपादन आवश्यक होते त्यातील 70% भूसंपादन महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले आहे.
यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयने छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतलेले असून हा प्रस्तावित महामार्ग आणि रिंगरोड बऱ्याच ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे सोलापूर ते पुणे-बेंगलोर रस्त्यादरम्यानचा जो काही 31 किलोमीटरचा रस्ता होता त्या रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावे अशा पद्धतीचे ठरलेले होते.
त्यामुळे साहजिकच या 31 किलोमीटरचा जो काही रस्ता होता तो वगळून इतर रस्त्याच्या कामाकरिता महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या माध्यमातून निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता हा 31 किलोमीटर रस्त्याचे काम देखील महामंडळानेच करावे असे सांगत हा एकतीस किलोमीटरचा रस्ता पुन्हा एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आलेला आहे
व याकरिता आता तीन टप्पे करून एमएसआरडीसीने टेंडर मागवलेले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण रिंग रोडचे काम 12 टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. यासाठीचे टेंडर भरण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत देण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
कसा आहे पूर्व भागातील रिंगरोड?
हा पूर्व भागातील रिंग रोड पुणे-मुंबई दृत गती महामार्ग आणि नासिक-सोलापूर आणि सातारा-बेंगलोर महामार्गाला जोडणारा आहे. तसेच मावळ, खेड, पुरंदर, भोर आणि हवेली तालुक्यातून जाणार असून या पाचही तालुक्यातील जवळपास 46 गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे.
पूर्व भागातील रिंगरोडची एकूण लांबी 103 किलोमीटर असून त्याची रुंदी 110 मीटर इतकी आहे. हा पूर्व भागातील रिंगरोड सहा पदरी असणारा असून त्यावर सात बोगदे, सात अंडरपास आणि दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील पूल असणार आहेत.
या रिंगरोड करिता 859.88 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून याकरिता 1434 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे व संपूर्ण बांधणीचा खर्च 4713 कोटी रुपये इतका येणार आहे.