शेतकऱ्याच्या जीवनात गुलाबाने आणला सुगंध! घेतो 5 लाखाचे उत्पन्न

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे या गावाचे रहिवासी असलेले प्रगतिशील शेतकरी पोपट साळुंखे यांनी गुलाब शेतीतून चांगल्या प्रकारे आर्थिक समृद्धी साधली आहे व गुलाब शेती कशी फायद्याची असते हे इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे.

Ajay Patil
Updated:
rose farming

Rose Farming:- पारंपारिक शेती ऐवजी आता भाजीपाला आणि फळ पिकांसोबतच फुलशेती देखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. फुलशेतीमध्ये प्रामुख्याने शेडनेट मधील फुलशेती आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत व प्रामुख्याने पुण्यासारख्या परिसरामध्ये शेडनेटच्या साह्याने फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे.

फुल शेतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक छोट्या-मोठे समारंभापासून तर लग्नकार्यापर्यंत फुलांचा वापर आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे तसेच बरेच सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी देखील फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे आता फुलांना बाजारपेठेत मागणी वर्षभर टिकून राहते व शेतकऱ्यांना देखील यामुळे चांगला बाजार भाव मिळतो.

तसेच योग्य नियोजन आणि कमी खर्चात उत्तम नफा देणारी शेती म्हणून देखील फुलशेतीकडे पाहिले जाते. शेडनेटच नाही तर मोकळ्या क्षेत्रावर देखील बरेच शेतकरी फुलशेती यशस्वी करतात. फुल शेतीमध्ये महाराष्ट्रातील बरेच शेतकरी हे गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात.

अगदी याच मुद्याला धरून जर आपण सातारा जिल्ह्यात असलेल्या कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील प्रगतिशील शेतकरी पोपट साळुंखे यांची यशोगाथा पाहिली तर ती इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. साळुंखे यांनी गुलाब शेतीतून चांगल्या प्रकारे अर्थार्जन करायला सुरुवात केली असून त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून गुलाब शेतीत सातत्य ठेवलेले आहे.

 पोपट साळुंखे यांनी गुलाब शेतीतून साधली आर्थिक समृद्धी

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे या गावाचे रहिवासी असलेले प्रगतिशील शेतकरी पोपट साळुंखे यांनी गुलाब शेतीतून चांगल्या प्रकारे आर्थिक समृद्धी साधली आहे व गुलाब शेती कशी फायद्याची असते हे इतर शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे. साळुंखे हे गेल्या 40 वर्षापासून शेती व्यवसायात आहेत.

आतापर्यंत शेतीमध्ये त्यांनी अनेक पिकांचे उत्पादन घेतले. परंतु या पिकांसाठी करण्यात आलेला खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा कुठल्याही प्रकारे ताळमेळ बसत नसल्यामुळे त्यांनी पारंपारिक पिकांऐवजी काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला व गुलाबाची लागवड करावी हे मनात निश्चित केले

. त्यानंतर त्यांनी 30 गुंठे क्षेत्रामध्ये पाकळी गुलाब लावण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून ते गुलाबाचे चांगले उत्पादन घेतात व व्यापारी वर्ग शेतातूनच साळुंखे यांनी पिकवलेल्या गुलाबाची खरेदी करतात. गुलाबाची काढणी दोन दिवसानंतर केली जाते व एकावेळी त्यांना 40 ते 50 किलो गुलाबाचे उत्पादन मिळते. चार मजुरांच्या मदतीने गुलाबाच्या फुलांची काढणी केली जाते. त्यांनी लावलेल्या गुलाबाचा वापर प्रामुख्याने गुलकंद बनवण्यासाठी करतात.

पाकळी गुलाबाची लागवड त्यांनी 30 गुंठे शेतीमध्ये केली व तीन वर्षात आतापर्यंत 50 ते 60 गुलाबाच्या तोडण्या त्यांनी केलेल्या आहेत. या गुलाबाच्या माध्यमातून महिन्याला चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पादन ते घेतात. कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळेत उत्तम आर्थिक उत्पन्न या गुलाब शेतीतून ते मिळवत आहेत.

विशेष म्हणजे हे गुलाबाचे उत्पादन घेताना ते कुठल्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत नाहीत. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने ते गुलाबाचे उत्पादन घेतात

व त्यामुळे व्यापारी वर्ग देखील शेताच्या बांधावरून गुलकंद बनवण्याकरिता गुलाबाची खरेदी करतात. या सगळ्या मधून त्यांना वर्षाकाठी चार ते साडेचार लाख रुपयांचा फायदा होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

अशाप्रकारे आपल्याला साळुंखे यांच्या उदाहरणावरून दिसून येते की,परिस्थितीनुसार जर शेतीमध्ये बदल केला व बाजारपेठेचा कल ओळखून जर पिकांची लागवड केली तर शेती देखील लाखोत उत्पन्न देऊ शकते हे त्यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe