Snake Bite:- भारतामध्ये सापांचे अनेक प्रकार आहेत व त्यातील खूप कमी प्रकार हे विषारी आहेत. आपल्याला माहित आहे की साप चावल्याने त्याच्या विषामुळे जेवढे व्यक्ती मरत नाहीत तेवढे साप चावल्याच्या भीतीने मृत्यू होतात. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे प्रत्येक साप हा विषारी नसतो. परंतु साप चावल्यानंतर त्याचा उपचार हा खूप जोखमीचा असतो व विषारीपणाची खात्री झाल्यानंतर ताबडतोब उपचार सुरू होने खूप गरजेचे असते व त्यामुळे जीव वाचू शकतो.
साप चावल्यानंतर उपचारांना जेवढा उशीर होईल तेवढे नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे जर योग्य उपचार योग्य वेळी मिळाला तर साप चावलेल्यांपैकी 80% पर्यंत व्यक्ती वाचण्याची शक्यता बळावते. या दृष्टिकोनातून आपण साप चावल्यानंतर काय करू नये आणि कुठले प्राथमिक उपचार करावेत? इत्यादी महत्वाची माहिती घेऊ.
साप चावल्यानंतर काय करू नये?
1- सगळ्यात अगोदर म्हणजे ग्रामीण भागामध्ये साप चावल्यानंतर मांत्रिकाला बोलावले जाते. यामध्ये मांत्रिकाच्या मागे लागून वेळ वाया न घालवता लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.
2- साप चावल्यानंतर बऱ्याचदा आपण आवळपट्टी बांधतो. परंतु रक्त प्रवाह थांबेल अशा पद्धतीने आवळपट्टी अवयवांना बांधू नये. पूर्वी पाहिले तर अवयवावर एकाच ठिकाणी वर कुठेतरी आवळपट्टी बांधत असत. यामुळे जखमेतून जास्त रक्त जाते आणि त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबण्याची शक्यता बळावते. दोन तासांपेक्षा जास्त वेळ अशी पट्टी बांधलेली राहिली तर हात काळा पडून शेवटी कायमचा गमवावा देखील लागू शकतो.
3- जखमेतून रक्त काढू नये किंवा जखम कापण्याचा प्रयत्न करू नये किंवा तिला चोखु देखील नये. या सर्व गोष्टींचा कुठलाच उपयोग होत नाही उलट ते आपल्यालाच घातक ठरू शकते.
4- बऱ्याचदा आपण पाहिले असेल किंवा ऐकले असेल की काही लोक एकामागे एक कोंबड्यांचे गुद्दार जखमेला दाबून लावतात व याचा देखील काहीच उपयोग नसतो फक्त कोंबड्या मरतात.
साप चावल्यानंतर हे शास्त्रीय प्रथमोपचार करावेत
1- योग्य व ताबडतोब शास्त्रीय प्रथम उपचार केले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. कोणत्याही प्रकारचे तंत्र-मंत्र किंवा नवस केल्यामुळे सापाचे विष कमी होत नाही. यामध्ये नव्वद टक्के लोकांचा जीव हा साप विषारी नसल्यामुळेच वाचतो. परंतु साप चावल्याच्या भीतीने जीव जाऊ शकतो.
2- ज्या व्यक्तीला साप चावला आहे त्या व्यक्तीला धीर देणे खूप गरजेचे आहे. साप हे बिनविषारी असतात हे त्याला सांगणे खूप महत्त्वाचे असून त्याला धीर जितका देता येईल तितका प्रयत्न करावा.
3- ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे त्याला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे. त्याला बिलकुल चालायला लावू नये व शरीराची जास्त प्रमाणात हालचाल देखील करू देऊ नये. असे केले तर सापाचे विष शरीरामध्ये ताबडतोब पसरत नाही.
4- साप जर बिनविषारी असेल तर जखम धुवून जंतुनाशक औषध लावले तरी पुरेसे ठरते. परंतु तरी देखील रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणे आवश्यक असते.
5- संपूर्ण हाताला किंवा पायाला लवचिक पट्टीने बांधावे. त्यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरत नाही. सापाचे विष हे रक्तातून न पसरता मुख्यतः रस संस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी त्यातला प्रवाह थांबतो.
6- त्यानंतर हाताला किंवा पायाला लांब काठी बांधावी म्हणजे त्याची जास्त हालचाल होणार नाही.
7- त्यानंतर साप चावलेल्या व्यक्तीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये रुग्णाला झापड तर येत नाही ना किंवा कुठे रक्त वाहत नाही ना या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
अशापद्धतीने ओळखा विषारी साप
1- मन्यार– जातीचा साप हा काळपट निळसर रंगाचा असतो व त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. डोक्याकडे कमी जाडी तर शेपटीकडे जास्त जाडी असते व हा साप इतर सापांना देखील खातो.
2- नाग– जो साफ फणा काढून उभा राहतो त्याला आपण नाग म्हणतो. सायकलच्या ट्यूब मधून ज्या प्रकारे निघणाऱ्या हवेचा फुस्स असा आवाज होतो अगदी त्याचप्रमाणे आवाज हा नाग काढतो किंवा नागाचा येतो.
3- फुरसे– फुरसे जातीचा साप हा एक फुटभर लांबीचा असतो व त्याच्या शरीरावर नक्षीकाम तसेच डोक्यावर बाणा सारखी खूण असते व करवतीसारखा करकर आवाज करतो.
4- घोणस– हा साप कुकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज काढतो. यावर साखळी सारखे काळा रंगाचे ठिपके असतात व रेषा असतात. या जातीच्या सापाच्या डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते.