Strawberry Farming : शेती व्यवसायात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अलीकडे तर निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरत आहे. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी दुष्काळ तर कधी ढगाळ हवामान यामुळे शेतीचा व्यवसाय मोठा आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असा ओरड देखील करत आहेत.
शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योग-व्यवसाय करायचा असं आता सगळीकडेच ऐकू येत आहे. अशातच मात्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील एका प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीमध्ये नाविन्यपूर्ण आणि नवीन काहीतरी प्रयोग केला तर निश्चितच शेती ही फायदेशीर ठरू शकते असं दाखवून दिला आहे.
जुन्नर तालुक्याच्या मौजे बोरी बुद्रुक येथील सिद्धेश सुरेश जाधव उच्च शिक्षित असूनही शेती करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या चांगल्या प्रकाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. वडील स्वतः प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत नावाजलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतीमध्ये प्रयोग करण्याचा हा वारसा त्यांना वडीलापासूनच लागला आहे. यामुळे नोकरीला त्याग पत्र दिल्यानंतर त्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू केले.
याच प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पंधरा गुंठे शेतजमीनीत स्ट्रॉबेरीच्या व्ही वारा या वाणाची लागवड केली. विशेष म्हणजे आता या स्ट्रॉबेरी पिकातून त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. आत्तापर्यंत या पिकातून त्यांना एक टन इतकं उत्पादन मिळालं असून अजून दीड टन उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. त्यांनी उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी चवीला रुचकर असल्याने बाजारात मोठी मागणी आहे.
सध्या स्थितीला त्यांच्या स्ट्रॉबेरीला 150 रुपये चा दर मिळत आहे. भविष्यात देखील असाच दर कायम राहिला तर त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळण्याचीं आशा आहे. सिद्धेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरीच्या कलमसाठी त्यांना 50 हजाराचा खर्च आला. स्ट्रॉबेरी चे कलमे महाबळेश्वर येथून त्यांनी मागवली आहेत. याशिवाय सिद्धेश यांना स्ट्रॉबेरी लागवडीसह ठिबक सिंचन प्रणाली विकसित करण्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे.
त्याचे स्ट्रॉबेरी पिकासाठी 15 गुंठ्यात त्यांना अडीच लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला असून खर्च वजा जाता त्यांना चांगली कमाई होणार आहे. दरम्यान सिद्धेश यांनी स्ट्रॉबेरी लागवडीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देताना सांगितलं की, महाबळेश्वर येथून एक हजार कांडी स्ट्रॉबेरी ची त्यांनी मागवली. त्यापासून पंधरा हजार रोपांची निर्मिती त्यांनी आपल्या शेतात केली. यानंतर जमिनीची पूर्व मशागत झाली आणि जमिनीत एक ट्रॉली शेणखत, अर्धा ट्रॉली कोंबडं खताचा वापर त्यांनी केला.
विशिष्ट अंतर ठेवून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाडले मग यानंतर रोपांची लागवड झाली. रोपांची एक फुटावर ऑक्टोबर महिन्यात लागवड त्यांनी केली. आणि ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाचे काम करण्यात आले. दर पंधरा दिवसांनी गोमुत्राची फवारणी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केली. पिकासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला अन ठिबक, शेडनेट जाळी लावली वडिलांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने सिद्धेश यांनी स्ट्रॉबेरी शेतीत हे यश मिळवल आहे.
या ठिकाणी विशेष बाब अशी की, त्यांच्या वडिलांनी गेल्या 30 वर्षांपूर्वी ज्यावेळी जुन्नर तालुक्यात स्ट्रॉबेरी पिकाचीं माहितीही नव्हती त्यावेळी शेती सुरू केली आहे. तेव्हापासून जाधव कुटुंबीय स्ट्रॉबेरी पिकाची शेती करत असून यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभल आहे. निश्चितच जाधव कुटुंबीयांचा हा शेती मधला प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक काम करणार आहे.