Teacher Recruitment:- सरकारच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून 23 सप्टेंबर रोजी कमी पटसंख्येच्या शाळातील शिक्षकांच्या ज्या दोन जागा असतील त्यापैकी एका जागेवर कंत्राटी पद्धतीने डीएड, बीएड पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
परंतु नेमकी अशा पद्धतीने उमेदवाराची निवड कशी करावी किंवा त्याची प्रक्रिया कशी राहील किंवा निकष कोणते असतील याबद्दल मात्र कुठल्याही पद्धतीची माहिती देण्यात आलेली नव्हती व याबाबत क्षेत्रिय कार्यालयाकडून विचारणा करण्यात येत होती.
त्यामुळे आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती संदर्भात शिक्षण आयुक्तालयाच्या माध्यमातून अतिरिक्त सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आता निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असणे यानुसार गरजेचे राहणार आहे व स्थानिक उमेदवारांपैकीच एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आल्यास उमेदवाराला जास्त गुण असतील अशा उमेदवाराचा विचार नियुक्तीसाठी करावा असे या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
कंत्राटी शिक्षक नियुक्ती संदर्भात शिक्षण आयुक्तालयाने दिल्या परिपत्रकाद्वारे अतिरिक्त सूचना
कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असेल किंवा त्यासाठी कोणते निकष असतील याबाबत अतिरिक्त सूचना शिक्षण आयुक्तालयाने परिपत्रकाच्या माध्यमातून दिले असून त्यानुसार बघितले तर शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या संचमान्यतेनुसार 10 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत जर दोन शिक्षक कार्यरत असतील तर त्यापैकी एका शिक्षकाची प्रचलित कार्य पद्धतीने समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच संबंधित शाळेत दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा.
तसेच या माध्यमातून उमेदवाराची निवड करताना हा उमेदवार संबंधित शाळा ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्या ग्रामपंचायत हद्दीतीलच असणे गरजेचे आहे. यामध्ये जर एकापेक्षा जास्त स्थानिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले तर पहिली ते पाचवी या वर्गांकरिता डीएड आणि सहावी ते आठवी या वर्गांकरिता बीएड यामध्ये ज्या उमेदवाराला जास्त गुण आहेत अशा उमेदवारांची निवड करावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
त्यासोबतच काही उमेदवारांना जर समान गुण असतील तर अधिक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जो उमेदवार धारण करत असेल त्याला प्राधान्य द्यावे. याही मध्ये जर अधिक पात्रता समान असतील तर जो उमेदवार वयाने ज्येष्ठ असेल त्याला प्राधान्य द्यावे.
परंतु ज्या ग्रामपंचायत हद्दीतील शाळेत रिक्त पदे आहेत व त्या हद्दीतूनच उमेदवारांचे अर्ज आले नाहीत तर संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करावा असे देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
तालुक्यातून उमेदवार उपलब्ध झाला नाही तर संबंधित जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करावा असे देखील या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये शासन निर्णय बघितला तर जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करणे गरजेचे आहे.
महापालिका क्षेत्रात नियुक्ती असेल तर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांच्याशी आवश्यक करारनामा करावा लागेल. नगरपालिका क्षेत्रात संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा करणे गरजेचे राहिले असे देखील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या नियुक्तीचे काय?
महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या 5 ऑक्टोबरचा शासन निर्णय बघितला तर त्यानुसार शाळा पेसा क्षेत्रामध्ये असतील त्या शाळांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल ते शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावेत. परंतु दहापेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पद रिक्त नसेल तर दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या ज्या शाळांमध्ये असेल त्या शाळेत संबंधित उमेदवाराला नियुक्ती देता येईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.