भाजपचे लोकसभा निवडणुकीत सगळे प्लॅन फेल गेले. सगळ्या शक्यता फोल ठरल्या. एवढंच काय, तर राज्यातील नेतृत्वावरही शंका उपस्थित होऊ लागल्या. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट फिनिक्स पक्षाप्रमाणे उडाला. त्यांनी राखेतूनही सोनं काढलं. सगळं संपलं, असं चित्र दिसत असताना महाविकास आघाडीने अपक्ष विशाल पाटलांसह ३१ जागा जिंकल्या. भाजपसह शिंदे गट व अजितदादांचाही फुगा फुटला. त्यातल्या त्यात शिंदे गटाचा स्टाईक रेट इतर दोघांपेक्षा बरा राहीला. दुसरीकडे काँग्रेसने १३, ठाकरे गटाने ९ तर शरद पवार गटाने आठ जागा मिळवल्या. आता विधानसभेची तयारी सुरु झालीय. महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही नगर जिल्ह्यातील संभाव्य जागावाटपाचा स्वतंत्र व्हिडीओ आम्ही केलाय. आता नगर जिल्ह्यात भविष्यात कोणते आमदार दिसतील, याचाही आम्ही अंदाज घेतलाय. नगर जिल्ह्यात कोण निवडून येणार, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

मित्रांनो, लोकसभा निवडणूक जशी महायुती व महाविकास आघाडीत झाली तशीच विधानसभाही होण्यीच शक्यता आहे. फक्त वंचित बहुजन आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय असे स्थानिक पक्ष काय करतात, यावर जागावाटप ठरेल. हे स्थानिक पक्ष शक्यतो महायुती किंवा मविआत सहभागी होतील. वंचितने लोकसभा स्वबळावर लढली होती, त्यात त्यांना सपाटून मार खावा लागला. आता विधानसभेत ते काय करतात, हे पहावे लागेल. आता काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांतही दिसेल. तशीच भाजप, शिंदे गट व अजितदादांची महायुतीही विधानसभेत दिसेल. या प्रमुख सहा पक्षांचेच जागावाटप डोक्यात घेता, आपण नगर जिल्ह्यातील उत्तरेतील सहा मतदारसंघातील संभाव्य जागावाटप व संभाव्य आमदार पाहू…
पहिला मतदारसंघ आहे
अकोला
अकोल्याची जागा महायुतीत अजितदादा गटाला व मविआत शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी तेथे राष्ट्रवादीचे डाँ. किरण लहामटे व भाजपचे वैभव पिचड अशी लढत झाली होती. यावेळी अजितदादांकडून लहामटे यांचे तिकीट फिक्स समजले जाते. तर शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांचे तिकीट फिक्स समजले जाते. येथे वैभव पिचडांना उमेदवारी मिळाली नाही तर, ते अपक्ष लढण्याची शक्यता जास्त वाटते. या तिघांचीही लढत तुल्यबळ होईल. मात्र गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर, लहामटे थोड्याफार फरकाने दुसऱ्यांदा आमदार होण्याची शक्यता दिसते.
दुसरा मतदारसंघ आहे
संगमनेर
संगमनेरची जागा मविआकडून काँग्रेसला तर महायुतीकडून शिंदे गटाला जाण्याची शक्यता वाटते. येथे भाजपची ताकदही चांगली आहे. येथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. १९८५ पासून सलग आठ वेळा तेच आमदार आहेत. यावेळी त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र येथे गेल्या तीन-चार वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही भाजपची ताकद वाढविली आहे. भाजपचे अमोल खताळ हे थोरातांविरोधात लढण्यास इच्छुक दिसतात. पण जागावाटपानंतर थोरातांविरोधात कोण, हे ठरेल. मात्र सध्यातरी येथून थोरातच नवव्यांदा निवडून येण्याचा विक्रम करण्याची शक्यता आहे.
तिसरा मतदारसंघ आहे
शिर्डी
संगमनेरसारखेच शिर्डी मतदारसंघाचेही आहे. तेथून विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे सलग सात वेळा आमदार राहिले आहेत. गेल्यावेळी तर १ लाख ३२ हजार ३१६ मते मिळवून त्यांनी विजयाचे रेकाँर्ड केले होते. यावेळीही ही जागा भाजपला जाऊन विखेच उमेदवार राहतील असे दिसते. दुसरीकडे मविआकडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून प्रभाताई घोगरे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र काहीही झाले तरी पुन्हा विखेच येथून विजयी होण्याच्या शक्यता जास्त आहेत.
चौथा मतदारसंघ आहे
कोपरगाव
कोपरगावची जागा महायुतीत अजितदादा गटाकडे तर मविआत काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. अजितदादा गटाकडून विद्यमान आ. आशुतोष काळे यांनाच पुन्हा तिकीट मिळू शकते. मात्र अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तरच येथे गेल्यावर्षीप्रमाणे लढत होईल. परंतु अजितदादा गट महायुतीत राहिला, तर काळेंचे परंपरागत प्रतिस्पर्धी कोल्हे कुटुंबिय हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यता वाढतात. तेव्हा आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे अशी लढत होण्याची शक्यता आहे. तेव्हा मात्र ही लढत अटीतटीची होईल. याच्यापैकी कोण निवडून येईल हे सांगता येत नसले तरी फाईट तुल्यबल नक्कीच होईल.
पाचवा मतदारसंघ आहे
श्रीरामपूर
श्रीरामपूरची जागा मविआच्या जागावाटपात काँग्रेसकडे येईल. त्यांच्याकडून विद्यमान आ. लहू कानडे यांचे तिकीट सध्यातरी फिक्स दिसते. दुसरीकडे महायुतीत ही जागा शिंदे गटाला मिळाली तर भाऊसाहेब कांबळे व भाजपला मिळाली तर नितीन दिनकर अशी लढत होण्याची शक्यता आहे. येथे गेल्या काही वर्षांपासून भाजपचे वजन वाढले आहे. विखे गटही सक्रीय आहे. तरीही बाहेरचा उमेदवार म्हणून दिनकरांना श्रीरामपूरकर स्वीकारतील का, हा प्रश्न आहे. यावेळी येथील लढत रंगतदार होईल. भाऊसाहेब कांबळे यांची आमदार होण्याची शक्यताही येथून वर्तवली जात आहे.
सहावा मतदारसंघ आहे
नेवासा
नेवाशाची जागा मविआच्या जागावाटपात ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. तेथून विद्यमान आ. शंकरराव गडाख हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील. विरोधात महायुतीकडून ही जागा भाजपला मिळू शकते. येथे पुन्हा गेल्यावेळीसारखीच गडाख विरुद्ध बाळासाहेब मुरकुटे अशी लढत दिसण्याची शक्यता आहे. मात्र मुरकुटेंच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध होण्याची शक्यता आहे. भाजपकडून ऋषिकेश शेटे यांचेही नाव अचानक चर्चेत येते. शिवाय माजी खा. स्व. तुकाराम गडाख यांच्या कुटुंबातील रवी गडाख, किसनराव गडाख यांनीही तयारी केल्याचे चित्र आहे. मात्र येथून शंकरराव गडाखच निवडून येण्याची शक्यता आहे.
उद्या आम्ही दक्षिणेतील संभाव्य आमदार सांगणार आहोत.