Cibil Score:- जेव्हा आपण बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा सगळ्यात आधी बँकेकडून आपला सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट रिपोर्ट चेक केला जातो. जर बँकेच्या नियमाप्रमाणे तुमचा सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला सहजरित्या कर्ज मिळते. आपल्याला माहित आहे की सिबिल स्कोर हा 300 ते 900 या अंकां दरम्यान मोजला जातो व यामध्ये जर सिबिल 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो उत्तम मानला जातो.
परंतु या सिबिल स्कोर च्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी बऱ्याच जणांना माहिती नाही. ती म्हणजे तुम्ही जर कधीही कर्ज घेतले नसेल किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला नसेल तर तुमचा कुठल्याही प्रकारची क्रेडिट हिस्टरी नसते व अशा प्रसंगी तुमचा सिबिल स्कोर -1 असतो व याला सामान्य भाषेत शून्य क्रेडिट स्कोर म्हटले जाते.

त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत बँकेकडे कर्ज मागायला जातात तेव्हा आज पर्यंत तुम्ही कुठलाही प्रकारची कर्जाची हिस्ट्री नसल्यामुळे बँकेला नेमक्या कोणत्या मुद्द्यावर तुमच्यावर विश्वास ठेवावा याबाबत बँकेत संभ्रम होऊ शकतो व बँक तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकते. अशाप्रसंगी मायनस सिबिल स्कोर कसा वाढवावा? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
मायनस सिबिल स्कोर कसा वाढवावा?
यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणे हा आहे. परंतु अशा प्रसंगी तुमचा क्रेडिट हिस्ट्रीच्या कमतरतेमुळे बँक तुम्हाला कर्ज देत नसतील तर तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय शिल्लक राहतात व यामध्ये पहिला म्हणजे एक तर तुम्ही बँकेकडून क्रेडिट कार्ड घ्यावे आणि ते वापरण्यास सुरुवात करावी आणि त्या क्रेडिट कार्डचे पेमेंट मात्र वेळेवर करावे.
त्यामुळे तुमचे कर्ज बँकिंग प्रणालीमध्ये सुरू होते आणि तुमचा सिबिल स्कोर दोन किंवा तीन आठवड्यात अपडेट होतो. दुसरा मार्ग म्हणजे बँकेत प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दोन लहान एफडी करणे आणि एफडी उघडल्यानंतर त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा अंतर्गत कर्ज घ्यावे. जेव्हा तुम्ही तुमच्या फिक्स डिपॉझिट वर ओव्हरड्राफ्ट अंतर्गत पैसे काढतात तेव्हा तुमचे कर्ज सुरू होते आणि तुम्ही कर्जाची परतफेड केली तर तुमचा क्रेडिट स्कोर अपडेट केला जातो.
यामध्ये जर आपण काही तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मते जर सिबिल स्कोर मायनस असेल तर बँका इतर पॅरामीटर्स वर व्यक्तीच्या विश्वासार्हतेचा विचार करू शकतात. या परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचे उत्पन्नाचे स्त्रोत तसेच त्याची शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबींचा विचार केला जातो. समजा एखादी व्यक्ती डॉक्टर किंवा सीए असेल किंवा एखाद्या उच्च पदावर असेल तर त्याची क्रेडिट हिस्टरी नसली तरी देखील त्याला कर्ज मिळू शकते.
कारण अशा व्यक्तींचे उत्पन्न चांगले असते. परंतु तुमच्याकडे अशा पद्धतीची नोकरी नसेल तर तुमच्या आर्थिक स्थिती चांगली असल्याचे दाखवण्यासाठी तुम्ही तुमचे काही वर्षाचे बँकेचे स्टेटमेंट देऊन बँकेला तुमच्या व्यवहाराबद्दल खात्री करून देऊ शकतात. तसेच तुम्ही तुमचे सर्व बिले दाखवू शकता जी तुम्ही आतापर्यंत नियमितपणे पेड केली आहेत. या सगळ्या गोष्टी करून जर बँकेला खात्री असेल तर ती तुम्हाला कर्ज देऊ शकते आणि खात्री पटली नाही तर नाकारू देखील शकते.