Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी आपल्या राज्यात देखील झाली आहे. गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक असून याची राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पेरणी केली जाते.
ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी पुरेशी सिंचनाची सोय उपलब्ध असते असे शेतकरी बांधव प्रामुख्याने रब्बी मध्ये गव्हाची पेरणी करत असतात. खरं पाहता गहू या पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत असे उत्पन्न मिळतं. मात्र यासाठी गव्हाच्या पिकात पोषण व्यवस्थापन करणे देखील महत्वाचे असते.
गव्हाची 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत वेळेवर पेरणी केली जाते, तसेच 15 नोव्हेंबर पासून पुढे उशिरा पेरणी शेतकरी करतात. उशिरा पेरणी केलेल्या गव्हाचे उत्पादन मात्र कमी होते. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केली असेल त्या शेतकऱ्यांचा गहू हा जवळपास दोन महिन्यांचा तयार झाला असेल.
पीक हे जोमदार वाढीच्या अवस्थेत असेल. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांनी पिकाचे पोषण व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले तर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. यामुळे आज आपण 55 ते 70 दिवसाचे गव्हाचं पीक तयार झाल्यानंतर कोणत्या खताची मात्रा पिकाला दिली पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
जाणकार लोकांच्या मते, गव्हाचे पीक ५५ ते ७० दिवसांचे झाले की १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी केली पाहिजे. १० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९ याप्रमाणे घेऊन दोन वेळा फवारणी केली तर उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी पिकाला हे खत दिले तर पीक वाढीस मदत होते. यामुळे उत्पादनात देखील भरीव वाढ होत असते.
याशिवाय दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करण्याचा सल्ला जाणकारांकडून देण्यात आला आहे. म्हणजे १० लि. पाण्यात २०० ग्रॅम युरिया फवारणी दाणे भरण्याच्या अवस्थेत केली पाहिजे.
निश्चितच अशा पद्धतीने खतांचे व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. यासाठी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेणे मात्र अनिवार्य राहणार आहे.