ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. याच शेतीसंबंधी अनेक शासकीय कामे किंवा कागदपत्रे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आवश्यक असतात व ते प्रामुख्याने गावात असलेल्या तलाठी कार्यालयांमधून आपल्याला उपलब्ध होत असतात.
जमिनीच्या बाबतीत असलेले काही शासकीय कामे तसेच खरेदी विक्रीच्या प्रकरणाशी संबंधित बाबी या प्रामुख्याने तलाठी कार्यालयातून तलाठ्याच्या माध्यमातून पार पाडली जातात. यामध्ये फेरफार असो किंवा वारस नोंदी, वारस दाखला, सातबारा उतारा आणि 8 चा उतारा यासारखी कागदपत्रे तुम्हाला तलाठ्याकडूनच प्राप्त होतात.
परंतु बऱ्याचदा एकाच तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त गावांचा भार दिला असल्यामुळे वेळेवर तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध होतीलच असे नाही. आपल्याला वारंवार तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. त्यामुळेच आता यासंबंधीची बरीच कामे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये जर आपण वारस नोंद करायचा विचार केला तर हे देखील तुम्ही आता ऑनलाइन पद्धतीने करू शकणार आहात.
वारस नोंद म्हणजे नेमके काय?
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेत जमीन किंवा इतर मालमत्ता असते व दुर्दैवाने अशा व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती जमीन मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आतमध्ये वारस नोंदणीसाठी अर्ज करणे गरजेचे असते.
यामध्ये एखाद्या मालमत्ता धारकाचा जर मृत्यू झाला तर मृत झालेल्या व्यक्तीची विधवा, मृताचा विधुर पती, मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी आणि मृताची आई हे व्यक्ती त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा वारस म्हणून उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा अधिकृत प्रमाणपत्राकरिता अर्ज करू शकतात.
वारस नोंद करण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?
वारस नोंदी करिता वैध माहितीसह फॉर्म भरणे गरजेचे असून घर नोंदणी प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा, न्यायालयीन शिक्का, रेशन कार्ड, वारसांचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, अर्जदार ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत व्यक्ती जर सरकारी सेवेमध्ये कार्यरत असेल तर सेवा नियमावली आणि सेवा आयोगाच्या सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आवश्यक असते.
वारसांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने वारसांची नोंदणी करता येऊ शकते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने वारसांच्या ऑनलाईन नोंदणी करीता ई हक्क प्रणाली सुरू केलेली आहे. या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वारस नोंदणी करू शकतात व त्याकरिता….
1- याकरिता सर्वप्रथम तुम्हाला pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2- या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पब्लिक डाटा एन्ट्री या पेजवर रिडायरेक्ट म्हणजेच पूर्ननिर्देशित केले जाईल.
3- त्यानंतर आता ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता सर्वात खाली प्रोसीड टू लॉग इन बटणावर क्लिक करावे.
4- यावर क्रिएट न्यू युजर अकाउंट या पर्यायावर क्लिक करून नवीन नोंदणी करून आपले युजरनेम पासवर्ड तयार करून घ्यावे.
5- जेव्हा तुमची नोंदणी पूर्ण होईल तेव्हा लाल अक्षरातील संदेश तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल व आता डॅशबोर्ड वर परत जाण्यासाठी बॅक या बटणावर क्लिक करावे.
6- त्यानंतर तुम्ही तयार केलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर त्या ठिकाणी डिटेल्स पृष्ठ उघडा आणि सातबारा म्युटेशन या पर्यायावर क्लिक करावे.
7- त्यानंतर युजर इज सिटीझन किंवा युजर इज बँक यासारख्या वापरकर्त्याच्या प्रकारावर आधारित पर्याय निवडावा आणि प्रक्रिया बटणावर क्लिक करावे.
8- त्यानंतर चेंज रिक्वेस्ट सिस्टम ई हक्क पेज उघडते. या पेजवर काही माहिती भरल्यानंतर वारस नोंदणी पर्याय निवडावा आणि ज्या करिता तुम्ही वारस बदलासाठी अर्ज करू इच्छिता.
9- त्यानंतर वारस बदल अर्ज तुमच्यासमोर उघडला जाईल. या ठिकाणी अर्जदाराने संपूर्ण तपशील भरावा आणि सुरू ठेवा या बटनावर क्लिक करावे.
10- त्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव किंवा त्याचा खाते क्रमांक प्रविष्ट करा व पुढे फाईंड अकाऊंट होल्डर या पर्यायावर क्लिक करून मृत व्यक्तीचे नाव निवडावे.
11- त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडा आणि मृत व्यक्तीच्या मृत्यूची तारीख टाका आणि नंतर समाविष्ट करा या पर्यायावर क्लिक करा व खातेदाराच्या जमिनीची माहिती त्या ठिकाणी दिसत असल्याची खात्री करा.
12- आता अर्जदार वारसांपैकी एक आहे का? असा प्रश्न तुमच्या समोर येईल. त्या ठिकाणी होय किंवा नाही मधून योग्य पर्याय निवडा आणि फील इन हेअर नेम या पर्यायावर क्लिक करा.
13- तुम्हाला ज्या वारसाचा उल्लेख करायचा आहे त्या वारसाचे नाव किंवा ज्या वारसाचे तुम्हाला नेमणूक करायचे आहे त्याची अचूक माहिती भरावी आणि नाव इंग्रजीत लिहावे. जन्मतारीख तसेच वय, मोबाईल नंबर, पासवर्ड इत्यादी आवश्यक बाबी निवडावे आणि नंतर उर्वरित माहिती भरावी.
14- त्यानंतर अर्जदाराचे मृत झालेल्या व्यक्तीसोबतचे नाते निवडावे आणि शेवटी सेव पर्यावर क्लिक करावे.
15- तुम्हाला जर एकापेक्षा जास्त वारसांची नोंद करायची असेल तर पुढील वारस वर क्लिक करून अनेक वारसांची नोंदणी तुम्ही करू शकतात.
16- वारसाचा तपशील भरल्यानंतर सुरू ठेवा बटनावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे ई हक्क प्रणाली पोर्टल वर अपलोड करा. यामध्ये तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच आधार कार्ड, वारसाच्या नावावर असलेल्या जमिनीची प्रत आठचा उतारा हे व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर करून घरीच आरामांमध्ये वारसांची ऑनलाईन नोंदणी करू शकता.