अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- भारताला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती आणि खरं स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं, असं म्हणत कंगना राणावत हिने नवा वाद उपस्थित केला होता.
कंगनाच्या या वक्तव्यावर टीका होत असताना ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केलं. याच मुद्द्यावरून राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गोखलेंवर निशाणा साधला आहे.
‘बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाला ४० बॉडीगार्डची सुरक्षा आणि पद्मश्री हा पुरस्कार मिळतो, हे बघून विक्रम गोखले पुढे आले. त्यांनाही पद्मश्री व्हायचंय वाटतं,’ असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील ताळेगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले कि, ‘कंगणा राणावत काय बोलते?
स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचा तिला अधिकार आहे का?’ ‘वादग्रस्त बोलणाऱ्यांचं बोलणं सहज नसतं, कोणीतरी यामागे आहे,’ असा आरोप थोरात यांनी केला. सर्व संत विचाराचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन् राज्यघटना तयार केली.
हे आज स्वातंत्र्यावर बोलत आहेत, उद्या राज्यघटनेवरही बोलतील. मात्र देश राज्य घटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम