अहमदनगर बातम्या

अतिवृष्टीने उध्वस्त ! अहमदनगरमधील किती हेक्टर पिके नष्ट ? किती हजार शेतकरी नुकसानग्रस्त? पहा आकडेवारी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस सुरु आहे. भंडारदरा, मुळा पाणलोटात देखील प्रचंड पाऊस सुरु आहे. अहमदनगरच्या दक्षिण भागात देखील मागील तीन ते चार दिवसांपासून जोर’धार’ सुरु आहे.

शुक्रवारी व शनिवारी नगर व जामखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत.

या पावसाने या दोन्ही तालुक्यातील ५ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील कापूस, बाजरी, कांदा, उडीद, सोयाबीन या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका ७ हजार ४२० शेतकऱ्यांना बसला आहे.

कोणत्या तालुक्यात किती नुकसान?
शुक्रवारी (दि.२३) रात्री नगर व जामखेड तालुक्यांत अतिवृष्टी झाली. १२ तासांत नगर तालुक्यात सरासरी ६४ तर जामखेड तालुक्यात ६६.७ मि.मी. पाऊस झाला. प्राथमिक अहवालानुसार नगर तालुक्यातील २७ गावांतील एकून ४ हजार ४२७.७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये कापूस, बाजरी व कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका ६ हजार ४५२ शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये ३ हजार ४२२.७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

जामखेड तालुक्यातील ६ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या गावांतील ७०३ हेक्टर क्षेत्रावरील उडीद, सोयाबीन व कांदा पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका ९६८ शेतकऱ्यांना बसला आहे.

२१ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सततच्या पावसामुळे राहुरी आणि अकोले तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राहुरी तालुक्यातील दोन गावांतील ९४ शेतकऱ्यांच्या ६६.६० हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले.

अकोले तालुक्यातील ५ गावांतील ११९ शेतकऱ्यांच्या ३३.४० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकांचे नुकसान झाले आहे. १०० हेक्टर क्षेत्रांपैकी ३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

किती टक्के नुकसान असले तर मिळते मदत?
मुसळधार पावसामुळे शेतपिकांना फटका बसला. महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे करुन प्राथमिक नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

 

 

Ahmednagarlive24 Office