अहमदनगर बातम्या

जिल्ह्याधिकाऱ्यांनी ‘त्या’ निर्बंधाचा फेरविचार करावा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- दहापेक्षा जास्त ॲक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या असलेल्या गावात जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

मात्र, लॉकडाऊनचा हा निर्णय अन्यायकारक असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आणि एकूण लोकसंख्या याचे प्रमाण तुलनात्मक दृष्टीने लक्षात घेता लॉकडाऊनच्या निर्णयाचा फेरविचार प्रशासनाने करावा, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील गावकरी, व्यापाऱ्यांनी दिले आहे.

खासदार डॉ.विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाऊन करण्यात आलेल्या आश्वी, लोणी खुर्द, बुद्रुक, कोल्हार, भगवतीपुर तसेच तिसगाव येथील गावकरी व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. हा निर्णय स्थानिक, व्यापारी व गावकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे नमूद करीत देण्यात आलेल्या निवेदनात या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीच्या वेळी जवळपास दीड वर्ष कोरोना प्रतिबंधाच्या काळात गेले असून आता कुठे परिस्थिती पूर्ववत होत आहे. येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून ठेवला आहे. त्यातच व्यापारी पेठेच्या गावात लॉकडाऊन करण्यात आल्याने जवळपास संपूर्ण नवरात्र उत्सव टाळेबंदीत संपेल.

यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या याचे प्रमाण विचारात घेतले. मात्र, लोकसंख्येचा देखील विचार करावा. प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी प्रशासनाने करावी. प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

असे संबंधित गावकरी व्यापाऱ्यांच्या वतीने खासदार विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नमूद केले.

Ahmednagarlive24 Office