Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरवात झाली अन राजकीय डावपेच पडायला सुरवात झाली. याची झळ निलेश लंके यांनाही बसली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे विश्वासू समजले जाणारे पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी त्यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला व त्यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वर्णी देखील लागली.
परंतु विक्रमसिंह कळमकर यांना गावातूनच धक्का बसला आहे. शनिवारी नीलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा श्रीगोंदा तालुक्यात असताना पाडळीच्या ग्रामस्थांनी नीलेश लंके यांची भेट घेत आम्ही तुमच्यासोबत असून तुम्हाला गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊ असा शब्द दिला.
यावेळी पाडळीच्या विद्यमान उपसरपंच वैशाली करंजुले या उपस्थित होत्या तसेच त्यांच्यासोबत सेवा संस्थेचे चेअरमन डी. बी. करंजुले, विठ्ठल साठे हे देखील होते. सोबतच किरण साठे, नितीन साठे, राजू साठे, सदाशिव कळमकर प्रथम करंजुले, गणेश करंजुले, कारभारी पोटघन, सतीश भालेकर आदींची देखील उपस्थिती होती.
..आम्ही जास्त मताधिक्य देऊ
यावेळी आलेल्या ग्रामस्थांनी म्हटले की, निलेश लंके यांनी सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी मागणी केल्याप्रमाणे कोट्यावधी रुपयांचा निधी विकासकामांना दिला. असे असतानाही कळमकर यांनी कोणालाही विचारात न घेता लंके यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
तसेच या आधी देखील त्यांनी पक्ष विसंगत कारवाया केल्या आहेत की ज्यात, मागील पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे काम करणे, बाजार समितीची निवडणूक, सैनिक बँकेच्या निवडणुकीत लंके यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात काम करणे आदींचा समावेश असल्याचे यावेळी ग्रामस्थ म्हणाले.
त्यामुळे आम्ही लंके यांच्या सोबत असून आम्ही त्यांना गावातून मोठे मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली. तसेच राजकारणात आम्हीच विक्रमला मोठे केले होते याची आठवणही त्यांनी करून दिली.
स्वाभिमानी ग्रामस्थ लंके साहेबांसोबत…
यावेळी बोलताना विठ्ठल साठे म्हणाले, विक्रम यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे. आम्ही या निर्णयाशी सहमत नसून पाडळी रांजणगावचे स्वाभिमानी ग्रामस्थ लंके साहेबांसोबत राहतील.