अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- नुकतीच ईडीने साताऱ्यातील जरंडेश्वर या साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. आता त्याच यादीत समावेश असलेल्या पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याच्या संबंधीही ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
त्यामुळे जरंडेश्वरनंतर आता पारनेरमध्ये कारवाई होण्याची अपेक्षा असल्याचे याचिकाकर्ते बबनराव कवाद आणि रामदास घावटे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या अधिपत्याखालील क्रांती शुगर या कंपनीने पारनेरचा कारखाना विकत घेतला आहे.
दरम्यान पारनेर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी चौकशीची मागणी करणारी याचिका पारनेर साखर कारखाना बचाव समितीने पूर्वीच औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे.
पारनेर बचाव समितीने या कारखान्याच्या विक्रीत काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप करून याची चौकशी ईडीने करावी, अशी मागणी केलेली आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतरच चौकशी करण्यात येईल, अशी भूमिका त्यावेळी ईडीने घेतली होती.
समितीने गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले असून तेथे हे प्रकरण प्रलंबित आहे.