अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- ‘महिलांना प्रार्थनेचा समान हक्क मिळावा यासाठी जेव्हा आम्ही शनिशिंगणापूर, हाजी अली दर्गा, त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन करीत होतो, तेव्हा खासदार नवनीत राणा कुठे होत्या?’ असा सवाल भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
त्यावेळी महिलांच्या हक्कासाठीच्या आंदोलनांना पाठिंबा देणे तर दूरच हेच राणा दाम्पत्य आमच्यावर हसत होते. आता त्यांची राजकीय स्वार्थासाठी स्टंटबाजी सुरू आहे,’ अशा शब्दांत देसाई यांनी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
राणा दाम्पत्याच्या मुंबईतील आंदोलनाच्या निमित्ताने देसाई यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. व्यक्त करताना तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘महिलांना बंदी असलेल्या मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी आम्ही आंदोलन केले.
तेव्हा हे राजकीय लोक कोठेच दिसले नाहीत. आता मात्र केंद्रात एखादे मंत्रीपद मिळावे म्हणून हनुमान चालीसा पठणचा राजकीय स्टंट करण्यासाठी ते पुढे आले आहेत. तुम्हाला हनुमान चालीसा वाचायची आहे तर तुम्ही कोठेही वाचू शकता.
तो तुमचा हक्कच आहे. मात्र, एखाद्याला डिवचण्यासाठी देवांचा गैरवापर होता कामा नये. राजकीय स्वार्थासाठी राज्यातील वातावरण अस्थिर करण्यासाठी देवाला मध्ये आणून कोणी खोटे नाटक करीत असेल तर ते चुकीचे आहे.
तेव्हाही आम्ही महिलांचे अधिकार आणि हक्क मागत होतो. संविधानाने आम्हालाही प्रार्थनेचा आणि समानतेचा अधिकार असल्याचे सांगत होतो.
तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला नाही आणि आता त्यांना अधिकार आणि संविधानाची जाणीव झाल्याचे दिसते, हा सर्व स्टंट आहे. जनतेनेत सावध झाले पाहिजे,’ असेही देसाई म्हणाल्या.