नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाकडून चिंता व्यक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या परिस्थितीतही नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहर्‍यावर मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर याकडे नागरिकांनी अधिक गांभीर्याने पाहून नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. एन. गिरीश राव आणि डॉ. सुशील गुरिया या दोन सदस्यांचे केंद्रीय पथक आज कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नगर शहरात दाखल झाले.

हे पथक तीन दिवस जिल्ह्यात राहणार असून विविध भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. डॉ. राव हे बंगलुरू येथील एनआयएमएचए संस्थेत साथरोगशास्त्रज्ञ आहेत तर डॉ. गुरिया हे दिल्ली येथील एसजेएस संस्थेत वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

आज या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,

जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड,

रोहिणी नर्‍हे, उज्ज्वला गाडेकर, पल्लवी निर्मळ, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदीची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी या पथकाने जिल्ह्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली. सध्या जिल्ह्यात होत असलेल्या एकूण चाचण्यांचे प्रमाण, रुग्ण बाधित येण्याचे प्रमाण, जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या,

तेथील नागरिकांच्या चाचण्या आणि सर्वेक्षण आदींबाबत सविस्तर माहिती घेतली, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा.

तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरु करणे अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ दिसत असली तरी चाचण्यांचे प्रमाणही वाढवावे.

जेणेकरुन बाधित रुग्णांना शोधून संसर्ग चाचणी तोडणे सोपे होईल. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, यासाठी नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेची त्यांनी माहिती घेतली. लसीकरण जेवढे जास्त होईल, तेवढे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केंद्रीय पथकाला सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

जिल्ह्याच्या काही भागात विशेषता महानगरपालिका, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव या ठिकाणी रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त आहे. याशिवाय, ज्याठिकाणी सध्या रुग्णवाढीचा वेग कमी दिसत असला तरी आगामी काळात तो वाढणार नाही,

यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील सीसीसी सेंटर, तेथील बेडस उपलब्धता आणि संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी पथकाला देण्यात आली.

बेडस उपलब्धता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या, हॉस्पिटल्सकडून आकारण्यात येणारे बिल आदींसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून समन्वय साधून काम वेगाने करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्रीय पथकाची कोविड केअर सेंटर आणि कन्टेन्टमेंट झोन येथे भेट :- आढावा बेठकीनंतर केंद्रीय पथकाने अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील बूथ हॉस्पिटल येथे भेट देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यानंतर केडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन तेथील लसीकरण केंद्राची माहिती घेतली.

सुवर्णानगर येथील कन्टेन्टमेंट झोनला भेट देऊन तेथील परिस्थितीचा तसेच महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदींची उपस्थिती होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24