अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे.
यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नुकतेच अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे आज सकाळपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार यांचे नातलग आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता.
यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात राहण्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.
ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याचं काही वाटत नाही. पण फक्त रक्ताचं नातं आहे म्हणून राजकारणाशी, कंपन्यांशी दुरान्वये संबंध नसलेल्या माझ्या बहिणींवर कारवाई केली जाते याचं वाईट वाटतं, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे.
राजकीय हेतूने ही धाड टाकली की आणखी काय माहिती हवी होती हे प्राप्तिकर विभागच सांगू शकेल. माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांवर धाड टाकली याबाबत मला काही म्हणायचं नाही,
मात्र अजित पवारचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने कोणत्या स्तराला जाऊन वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जात आहे या गोष्टीचा नक्की विचार केला पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले आहेत.