तहसीलदार म्हणाल्या लग्नांमुळे कोरोना संसर्गाचा फैलाव झाला असावा.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- पारनेर (नगर) सह कोल्हापूर,सांगली, सातारा जिल्ह्यात करोना विषाणूचा नवा प्रकार निर्माण झाल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पारनेर आणि कोल्हापूरमधील रुग्ण वाढीचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न जिल्हा,तालुका प्रशासनाकडून, होणे गरजेचे आहे. जनुकीय संरचनेत बदल झालेला नव्या प्रकारचा विषाणू निर्माण झाल्याबाबत प्रयोगशाळेकडून कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.

तालुक्याच्या पश्चिम भागात पिंपरी जलसेन,निघोज,लोणीमावळा येथे झालेल्या लग्नांमुळे या परिसरात करोना संसर्गाचा फैलाव झाला असावा. या गावांसह तालुक्यातील २२ गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत असे ज्योती देवरे,तहसीलदार, पारनेर यांनी सांगितले आहे.

पारनेर तालुक्यातील सुमारे साठ ते सत्तर कुटुंबे वीट भट्टीच्या व्यवसायामुळे कोल्हापूर शहरात स्थिरावली आहेत.वीट भट्टीसाठी लागणारे मजूर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी बहुल पट्ट्यातून दरवर्षी कोल्हापूरला नेण्यात येतात.

पावसाळा सुरू झाल्यावर वीट निर्मीतीचे काम थंडावते व पावसाळ्यातील चार महिने कोल्हापूर येथे वीट भट्टीवर काम करणारे मजूर आपापल्या गावी परततात. कोल्हापूरमध्ये वीट भट्टीवर काम करणारे सुमारे दीड हजार मजूर पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात परतले आहेत.

ढवळपुरी, वनकुटे, पोखरी, सुतारवाडी तसेच वावरथ, जांभळी (राहूरी) या परिसरातील तांड्यावर, वाड्यांवर राहणारे मजूर मोठ्या संख्येने कोल्हापूर येथून आपापल्या गावी परतल्याने या मजूरांच्या माध्यमातून विषाणूचा नवा प्रकार तालुक्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही शक्यता गृहित धरून कोल्हापूर येथून तालुक्यात परतलेल्या मजूरांचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी,संसर्ग तपासणी होणे आवश्यक आहे.

अहमदनगर लाईव्ह 24