अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अवैध वाळू तस्करी करणारे वाहन संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील सरपंच सतीश जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून तलाठी व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दाढ खुर्दचे सरपंच सतीष जोशी यांनी फोन करून
ग्रामस्थांच्या मदतीने अवैध वाळू तस्करीचे वाहन पकडल्याची माहिती तलाठी सांगळे यांना दिली. त्यामुळे सांगळे घटनास्थळी गेल्या.
याबाबत सरपंच जोशी यांनी सांगितले कि, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील रस्त्यावरून विना नंबरची झेनाँन गाडी प्रवरा नदीकडून येताना दिसली. त्यामुळे आम्हाला संशय आल्याने आम्ही ती गाडी थांबवून पाहणी केली असता
त्या गाडीमध्ये वाळू भरलेली होती. त्यामुळे वाहनातील व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानी सौरव संजय मकवाने (रा. दाढ बुद्रुक, ता. राहाता) व अविनाश गणपत पवार (रा. चंद्रपूर, ता. राहाता)
अशी नावे सांगितली, तर त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत असताना अंधाराचा फायदा घेऊन ते दोघे पळून गेले.
दरम्यान तलाठी सांगळे यांनी वाळू वाहनाची पाहणी करून १ लाख ४ हजार रुपये मुद्देमालाचा पंचनामा करीत वाळूचे वाहन पोलिसाच्या मदतीने आश्वी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.