महाराष्ट्र

Navi Mumbai News : अतिवृष्टीत नवी मुंबईत विविध अपघातांत ७ जणांचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २३ ते २८ जुलै या सहा दिवसांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या सात वेगवेगळ्या अपघातांत ७ जणांचा बळी गेला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे यातील सर्व अपघात हे निष्काळजीपणामुळे झाल्याचे आढळून आले आहे. या अपघातातील वाहनचालक अपघाताची माहिती न देता पळून गेले असून, पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सोना-चांदी कंपनीच्या गेटसमोर २३ जुलै रोजी रात्री झालेल्या अपघात डोंगऱ्याचा पाडा येथील कार्यक्रम संपवून घरी परतणाऱ्या आकाश पाटील (१९) या तरुणाच्या मोटारसायकलला वावंजे गावातील लहू शंकर गोंधळी याने दारुच्या नशेत टेम्पोची धडक दिल्याने आकाशचा मृत्यू झाला.

कळंबोली येथील स्टील अथॉरिटी कंपनीसमोरील चौकात याच रात्री तळोजा येथून पनवेलच्या दिशेने जाणारी मोटारसायकल रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे घसरल्याने मोटारसायकल चालक रस्त्यावर पडला. या वेळी ट्रेलरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वाशी येथून मोटारसायकलने उलवे येथे घरी परतणारा भीमराव शिरसाट (२४) याला बेलापूर उरण मार्गावर बंद स्थितीत उभ्या डंपरचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

२४ जुलै रोजी रात्री महापे शिळफाटा मार्गावर मित्रासह रस्ता ओलांडून जाणाऱ्या पापाई दास (३३) व त्याचा मित्र अर्जुन चौधरी याला टेम्पोने धडक दिल्याने पापाई दास याचा मृत्यू झाला, तर अर्जुन गंभीर जखमी झाला.

२५ जुलै रोजी रात्री नावडे फाटा येथून घोटगाव येथे घरी निघालेल्या किरण पवार यांच्या मोटारसायकलला व्हिनस कंपनीसमोरील रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरचा अंदाज आला नाही. या वेळी ट्रेलरवर मोटारसायकलसह धडकून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. २८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे मार्गावरील तुर्भे येथील उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकच्या दुरुस्तीचे काम क्लिनर करत असताना कॉईल घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलर चालकाला ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रेलर ट्रकवर धडकला. या अपघातात ट्रेलर चालक अली अहमद हवीवदुल्ला कान (३५) याचा ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकून पडल्याने जागीच मृत्यू झाला.

सानपाडा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने कटर मशीनच्या सहाय्याने पत्रा कापून त्याला बाहेर काढले. या अपघातात हायवा ट्रकच्या खाली दुरुस्तीचे काम करणारा क्लिनरदेखील गंभीर जखमी झाला. याच दिवशी सायंकाळी शिळफाटा रोडवरील महापे येथील उड्डाणपुलावर दादर येथून मोटारसायकलवरून शिळफाटा येथे जाणाऱ्या संतोष पोळ (३२) याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Ahmednagarlive24 Office