राज्याच्या राजकीय पटलावर सध्या एका युवकाचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे रोहित पवार…राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीत बसून त्यांच्यांशी आतापर्यंत पवार घराण्याबाहेरील अनेक व्यक्तींनी चर्चा केली असेल; परंतु शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, नातू पार्थ पवार यांच्यासह अन्य कुणालाही वारंवार ही संधी मिळालेली नाही.
शरद पवार यांची नात त्यांना कधीतरी ड्राईव्हिंग करून घरी घेऊन गेली असेलही; परंतु ती काही त्यांची राजकीय वारस नाही. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेतला, तर शरद पवार यांचा राजकीय वारसा चालविण्याची परंपरा रोहित या तरुणाकडं येईल, अशी चर्चा चालू आहे, त्यातच रोहित यांचं महत्त्व लक्षात यावं.
शरदराव यांनी देशातील साखर कारखानदारीचं नेतृत्व केलं. आता रोहित आॅल इंडिया शुगर मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचं नेतृत्त्व करीत आहेत. देशातील साखर कारखानदारीचे प्रश्न त्यांना माहीत आहेत. विविध व्यासपीठावर ते मांडीतही असतात. कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याचं व्यवस्थापन ते पाहतात. साखर उतारा, गाळप, उसाला भाव आदीबाबत त्यांचा कारखाना कायम आघाडीवर असतो.
पाणी प्रश्नासह अन्य प्रश्नांचाही त्यांचा अभ्यास आहे. त्यांचं नेतृत्व आश्वासक आहे. लोकांचे प्रश्न समजावून घेणं, त्यांच्या सुखदुखात सहभागी होणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, संकटात धावून जाणं, आपदग्रस्तांना धीर देणं हा त्यांचा स्थायीभाव.
आप्पासाहेब पवार यांनी शरद पवार यांचा त्यांच्या लहानपणी सांभाळ केला, त्यांचं शिक्षण केलं. आप्पासाहेबांचे रोहित हे नातू. त्यामुळं शरदराव आणि रोहित यांचं एक वेगळं भावनिक नातं आहे. रोहित हे नव्या पिढीचे प्रतिनिधी. समाज माध्यमांत ते सतत सक्रिय असतात. देशात घडणा-या अनेक महत्वपूर्ण घटनांवर ते व्यक्त होत असतात.
पवार कुटुंबीयांवर विरोधक करीत असलेल्या टीकेला ते प्रत्युत्तर देत असतात. त्यांच्या व्यक्त होण्यातला उपहास, विडंबन अनेकदा चर्चेत असतं. कधी कधी त्यांचा तिरकसपणा थेट शरद पवार यांचा वारसा चालविणारा असतो. रोहित पवार हे केवळ राजकीय वारशानं नेतृत्त्व मिळाले, म्हणून मोठे नाहीत. त्यांनी त्यांचं नेतृत्त्व कामातून सिद्ध केलं आहे.
नात्या-गोत्याच्या पलिकडं रोहित यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं कळत नाही, ही गृहितकं मोडीत काढून, रोहित यांनी केवळ शेतीबद्दल जाण बाळगली नाही, तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
शरद पवार यांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये दिसून येते. शरद पवारांकडं जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते. घरची परिस्थिती पाहता रोहित यांना परदेशात शिक्षण घेणं सहज शक्य होतं; मात्र त्यांचं पूर्ण शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई इथं झालं.
बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढं 12 वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर परदेशात शिक्षणाची संधी निर्माण झाली असताना, परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याच निर्णय रोहित यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारून व्यवसायात सक्रीय झाले.
वडिलांसोबत व्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढं आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले.
एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. आता नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघाची निवडणूक लढवून ते संसदीय राजकारणाचा श्रीगणेशा करण्याच्या प्रयत्नांत आहेत.
रोहित पवारांनी प्रामुख्यानं आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ‘सृजन’ हा उपक्रम त्यातीलच एक. ‘सृजन’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना व्यासपीठ मिळवून दिलं. याच माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजनही ते करत असतात.
तरुण-तरुणींनी व्यवसायाकडं वळावं, यासाठी रोहित पवार कायम प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करत असतात. नोकरीचा प्रश्न गंभीर असल्यानं, व्यवसायाच्या दृष्टीनं मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या उपक्रमांची गरज आहे, अशी त्यामागं त्यांची भावना आहे.