१ जानेवारी २०२५ मुंबई : ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक’ असा दावा करणारे शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला (ठाकरे) ‘जय महाराष्ट्र’ केल्याने साळवी पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचे निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चेहऱ्यांवर जबाबदारी सोपवण्याची रणनीती आखली आहे; पण शिवसेनेला (ठाकरे) त्यापूर्वीच कोकणात धक्का बसण्याची चिन्हे आहेत. साळवी यांच्यासोबत अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. साळवी यांनी लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच घेतली. उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, तालुकासंघटक,महिला तालुकासंघटक, माजी शिक्षण सभापती, युवती तालुका अधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक त्या बैठकीला उपस्थित होते. पक्ष त्यागाबाबत त्यावेळी विचारविनिमय झाल्याचे समजते.
कोकण हा शिवसेनेचा (ठाकरे) बालेकिल्ला मानला जातो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेड-गुहागर विधानसभा मतदारसंघ वगळता ठाकरेंची शिवसेना हद्दपार झाली. शिवसेनेने ही कसर भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून (ठाकरे) साळवी, तर शिवसेनेकडून किरण ऊर्फ भैय्या सामंत आमनेसामने होते. ‘पराभूत झालो, तरी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार असून मी पालकमंत्री होईन,’ असा दावा साळवी यांनी त्यावेळी केला होता; परंतु राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे आता भाजपमध्ये प्रवेश केला, तर विधान परिषदेवर संधी मिळेल; मतदारसंघात विकासकामे करता येतील. त्यामुळे सर्वांनी सोबत यावे, असे आवाहन साळवी यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. ६ जानेवारी ही तारीख जवळपास निश्चित झाल्याचे समजते. पदाधिकारी मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिकेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी सामंत यांना मिळाल्यानंतर शिवसेनेच्या (ठाकरे) अनेक पदाधिकाऱ्याऱ्यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. काहींनी छुप्या पद्धतीने सामंत यांना मदत केली. त्यामुळे सामंत निवडून आले. आता उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, युवती तालुका अधिकारीदेखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. हे तिघेही सामंत यांच्या उपस्थितीत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते
पक्षप्रवेशाचा कोणताही निर्णय झालेला नाही. उलट लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघात दोन मेळावे घेण्यात येणार आहेत. हे दोन्ही मेळावे पक्षवाढीसाठी असतील, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली. नक्की कोणत्या पक्षाच्या वाढीसाठी काम करणार? असा प्रतिप्रश्न केला असता त्यावर त्यांनी बोलणे टाळले.