आर्थिक

एटीएम एक परंतु कामे अनेक! एटीएमचा वापर करा आणि पैसे काढण्याशिवाय ‘ही’ कामे करा, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

जेव्हा आपण बँकेमध्ये खाते उघडतो तेव्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड दिले जाते. आता एटीएम कार्ड म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते की पैसे काढण्यासाठी आपण या कार्डचा वापर करतो त्याशिवाय एखाद्या ठिकाणी काही शॉपिंग केली तर आपण एटीएम स्वाईप करून समोरच्या व्यक्तीला पेमेंट करत असतो.

इतक्या पर्यंत आपल्याला एटीएमचा वापर माहिती आहे. परंतु एटीएमचा वापर नुसते पैसे काढण्यासाठीच नाही तर त्या व्यतिरिक्त अनेक पैशांच्या संबंधित कामांसाठी महत्त्वाचा ठरतो.

या दृष्टिकोनातून एटीएम चा वापर हा व्यक्तीला खूप मदत करणारा सिद्ध होतो. पेटीएमचा वापर करून तुम्ही पैसे काढण्याशिवाय काही महत्त्वाचे कामे करू शकतो व यामुळे आपल्याला वेळ देखील मोठ्या प्रमाणावर वाचतो. त्यामुळे या लेखात आपण एटीएमचा वापर करून कुठली कामे करता येऊ शकतात? याबद्दलची कामांची यादी पाहू.

 एटीएमचा वापर करून करता येतील महत्त्वाची कामे

1- बॅलन्स तपासणी मिनी स्टेटमेंट बघणे एटीएमच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येते हे आपल्याला माहित आहे. परंतु त्याशिवाय तुम्ही तुमच्या खात्यात झालेली व्यवहार मिनी स्टेटमेंटच्या माध्यमातून तपासू शकतात. मिनी स्टेटमेंटमध्ये तुम्ही शेवटचे जे काही दहा व्यवहार केलेले असतात ते तुम्हाला पाहायला मिळतात.

2- एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवर पैसे ट्रान्सफर करणे एटीएमचा सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एका कार्ड वरून दुसऱ्या कार्डवर पैसे देखील हस्तांतरित करू शकता. याबाबत जर आपण एसबीआयचे वेबसाईटचा आधार घेतला तर त्यांच्या वेबसाईट नुसार, तुम्ही एसबीआय डेबिट कार्ड वरून दुसऱ्या कार्डमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतात

व या माध्यमातून तुम्हाला दररोज 40 हजार रुपयापर्यंत पैसे ट्रान्सफर करण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून बँकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. याकरिता तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डचा पिन नंबर माहित असणे गरजेचे आहेच व त्याशिवाय ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या व्यक्तीचा एटीएम कार्डचा नंबर देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

3- क्रेडिट कार्डचे पेमेंट एटीएम कार्डचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या VISA कार्डचे पेमेंट करू शकतात. याकरिता तुम्हाला तुमचे कार्ड जवळ ठेवणे गरजेचे असून त्याचा पिन नंबर माहित असणे गरजेचे आहे.

4- एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणे तुम्हाला एटीएमचा वापर करून एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे देखील ट्रान्सफर करता येतात व यामध्ये तुम्ही एका एटीएम सोबत कमाल 16 अकाउंट लिंक करू शकता.

5- जीवन विम्याचा हप्ता भरणे तुम्ही एटीएम कार्डचा वापर करून विम्याचा प्रीमियम देखील भरू शकतात. त्यामध्ये तुम्ही एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ आणि एलआयसी सारखे अनेक विमा सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा विमा हप्ता भरू शकतात. कारण या कंपन्यांनी बँकांशी करार केलेला आहे. तुम्हाला एटीएमचा वापर करून विम्याचा हप्ता भरता येतो व त्याकरिता तुम्हाला पॉलिसी क्रमांक माहित असणे आवश्यक असते.

6- चेकबुकची रिक्वेस्ट पाठवणे तुम्हाला नवीन चेकबुक हवे असेल तर तुम्हाला बँकेत न जाता तुम्ही एटीएमच्या माध्यमातून चेक बुकची रिक्वेस्ट बँकेला पाठवू शकता. त्यानंतर तुमच्या राहत्या पत्त्यावर चेकबुक पाठवले जाते. तुम्हाला जर यावर ऍड्रेस चेंज करायचा असेल तर तो देखील तुम्ही चेंज करू शकता.

7- बिल पेमेंट एटीएमचा वापर करून कोणत्याही प्रकारचे युटिलिटी बिल भरता येऊ शकते. यामध्ये तुम्हाला ज्या कंपनीचे बिल पेड करायचे आहे त्या कंपनीचा बँकेचे टायअप झालेला असणे गरजेचे असते.

8- मोबाईल बँकिंग रजिस्ट्रेशन जेव्हा आपण आता बँकांच्या माध्यमातून जर खाते उघडले तर त्यासोबत आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुरू करणे गरजेचे असते व बँकांच्या माध्यमातून अशा प्रकारचे सुविधा सुरू केली जाते. परंतु तुमचे जर मोबाईल बँकिंग कार्यरत नसेल तर तुम्ही एटीएमचा वापर करून ही सुविधा ऍक्टिव्ह करू शकता.

9- एटीएमचा पिन बदलणे समजा तुम्हाला जर तुमच्या एटीएम कार्डचा पिन चेंज करायचा असेल तर तुम्ही ते एटीएम मध्ये करू शकतात व होणाऱ्या संभाव्य सायबर फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकता.

Ajay Patil