अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- अहमदनगर : युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यात घडली. विवाहिता जास्त भाजल्याने पुणे येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

जखमी विवहितेवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणाऱ्या देऊळगाव सिध्दी येथील एका युवकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही विवाहिता मूळची गुंडेगाव येथील असून घोसपुरी हे तिचे सासर आहे. घटना घडली त्यावेळी ती माहेरी वडिलाकडे आलेली होती. तो तिला म्हणाला, तु मला आवडतेस व मी तुला पसंत करतो. तु तुझ्या नवर्‍याला सोड चिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवुन घेवुन जाईन, अशी धमकी दिली. पीडित विवाहितेने अभिमन्यूला समजावून सांगितले; पण तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

त्याचा त्रास असाह्य झाल्याने शेवटी तीने पेटून घेतले.
यामध्ये ती जास्त भाजली होती. तिला उपचारासाठी पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ससुन हॉस्पिटल गाठले. तिचा जबाब नोंदविला. यावेळी सर्व घटनाक्रम समोर आला. दरम्यान उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी संबंधिता विरोधात गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेराडे करीत आहेत.