अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.

दरम्यान राज्यातील साखर कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय झाला आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोल्हे सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात उच्चांकी गाळप केल्याबद्दल कर्मचारी, अधिकारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांचा गुरूवारी सत्कार करण्यात आला

त्याप्रसंगी संचालक विवेक कोल्हे बोलत होते. यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, राज्यातील साखर कारखानदारीचे सर्व पायलट प्रकल्प माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सर्वप्रथम संजीवनीत सुरू केले त्याचा इतरांना नेहमीच फायदा झालेला आहे.

अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सातत्यांने अत्याधुनिकतेचा ध्यास घेत उपपदार्थ निर्मीतीबरोबरच औषधी उत्पादनांत आत्मनिर्भरतेच्यादृष्टीने पावले टाकली आहेत. सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याने त्यात देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे.

मागील हंगामात कारखान्याच्या सर्वच विभागाने जीव ओतून काम केल्याने कोल्हे कारखान्याचे आजवरच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाले.

चालू हंगामात देखील आपल्या कारखान्याला याही पुढचा टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी सर्वांनी साथ देत तालुक्याच्या कामधेनूचा नावलौकीक राज्यात वाढविण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करावेत.