पावसाळ्याच्या सुरुवातीसोबतच जून महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. विशेषतः 16 जूनपासून सुरू झालेला पंचक काळ अनेक कार्यांसाठी अशुभ मानला जातो. धार्मिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्रानुसार पंचकाच्या या पाच दिवसांत काही विशिष्ट कामं टाळणं केवळ शहाणपणाचं नव्हे, तर आवश्यकही मानलं जातं. कारण या काळात केलेल्या चुका अनेकदा आर्थिक नुकसान, मानसिक अस्वस्थता किंवा कौटुंबिक संकटं निर्माण करू शकतात.

पंचक म्हणजे नक्की काय?
पंचक म्हणजे नक्की काय? हिंदू पंचांगानुसार, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो आणि धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद व रेवती या पाच नक्षत्रांमधून जातो, तेव्हा तो काळ पंचक मानला जातो. या काळाला अत्यंत संवेदनशील व धार्मिकदृष्ट्या प्रतिबंधित मानलं जातं. यंदा हा पंचक 16 जूनपासून सुरू होऊन 20 जूनपर्यंत चालणार आहे.
या पंचकात एकीकडे वैधृती योग, रवि योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संगम होतो आहे, पण तरीही पंचकाचे नियम पाळणं हे अधिक महत्त्वाचं आहे. या काळात घरात नवीन पलंग बनवणं, छप्पर घालणं, मोठं बांधकाम सुरू करणं किंवा नवीन प्रवासाचं नियोजन करणं अशुभ मानलं जातं. विशेषत: लाकडाचा पलंग बनवणं किंवा खरेदी करणं टाळावं, असं म्हटलं जातं, कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांवर आरोग्यविषयक संकट येऊ शकतं किंवा अनिष्ट घटना घडू शकतात.
‘या’ दिशेला प्रवास टाळा
पंचक काळात प्रवासाचीही विशेषतः दक्षिणेकडील दिशेने योजना करणं टाळावं. जर अत्यावश्यक प्रवास असेल, तर योग्य पूजाअर्चा, मंत्रस्मरण किंवा अन्य उपाय करणे आवश्यक मानले जाते. शिवाय, या काळात सोने, वाहन, चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. यामुळे अनावश्यक आर्थिक नुकसान टाळता येऊ शकतं.
पंचकात जर कुणाचा मृत्यू झाला, तर धार्मिक परंपरेनुसार, कुटुंबावर पुढे दुःख येऊ नये म्हणून पाच पुतळे तयार करून त्यांचे विशेष अंत्यसंस्कार केले जातात. ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते, कारण पंचकातील अंत्यसंस्कार अन्य सदस्यांवर परिणाम करतात, असं मानलं जातं.