file photo

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील सुरेगाव शिवारात ३० वर्षीय अज्ञात महिलेचा खून करण्यात आला. डोक्यावर हत्याराने मारुन अंगावरील साडीच्या पदराने तिचा गळा आवळण्यात आला.

महिलेची ओळख पटू नये म्हणून महिलेच्या चेहऱ्यावर केमिकल टाकून तिचा चेहरा विद्रूप केला. ही खळबळ जनक घटना शुक्रवार सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास समजली.

सुरेगाव येथील दत्तात्रय संपत रोडे यांच्या जमिनीच्या बांधावर मृतदेह दिसताच सुरेगावचे पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांनी पोलिसांना माहिती कळवली.

पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक तसेच डॉग स्कॉडला पाचारण करत वरिष्ठांना कल्पना देत पाहणी केली.

घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदे येथे पाठवण्यात आला.

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील महादेव तान्हाजी रोडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तपास निरीक्षक दुधाळ करत आहेत.