file photo

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- पाथर्डी व शेवगाव शहराला सध्या पाणी पुरवठा करणारी पाथर्डी शेवगाव व 54 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अत्यंत जुनी झाल्याने शेवगाव व पाथर्डी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत अडचणी निर्माण होत होत्या.

त्यामुळे आमदार मोनिका राजळे ह्या 2018 पासून या दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत्या.

अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पाथर्डी शहर पाणीपुरवठा योजना प्रल्पासाठी 73 कोटी 47 लाख व शेवगाव शहर पाणीपुरवठा योजनांसाठी 67 कोटी 27 लाख रुपयांच्या स्वतंत्र योजनांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगर विकास विभाग असताना या पाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यावेळी तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून पाथर्डी व शेवगाव शहरांसाठी च्या योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली होती.

मात्र आज प्रत्यक्षात तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर व विविध अडचणी पार पाडून शेवगाव व पाथर्डीला शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.