अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत जामखेड तालुक्यातील तेलंगशी शाळेच्या चिमुकल्या ७५ विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पञ लिहीले आहेत.(pm modi)

संपूर्ण भारतात २०२१ हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. भारतीय पोस्ट विभागामार्फत ७५ लाख पोस्ट कार्ड ही विशेष स्पर्धा आयोजित केलेली आहे.

या स्पर्धेत जामखेड तालुक्यातील जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी या शाळेतील चौथी ते सातवीच्या ७५ विद्यार्थ्यांनी देशाच्या पंतप्रधानांना पञ लिहिले आहे.

विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासात गुणवत्तेइतकेच जीवनकौशल्ये विकसन व मूल्यसंवर्धन याला विशेष महत्त्व आहे. बालवयातच राष्ट्रभक्तीसारखे विविध मूल्ये रुजवून सर्जनशील व चिकित्सक विचार या जीवन कौशल्यांचा विकास हा शालेय उपक्रमांतून होत असतो.

शालेय स्तरावर आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानाअंतर्गत ‘भारत २०४७ साठी माझा दृष्टीकोन’ या विषयावर शाळेतील ७५ विद्यार्थ्यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना पञातून आपले विचार व्यक्त केले आहेत.

आजच्या तंञज्ञानाच्या युगात लोप पावत असलेली पञलेखन पद्धत विद्यार्थ्यांना अवगत व्हावी हाही यामागचा उद्देश आहे.