अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदवली गेली, तसाच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
लोक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशातील अनेक राज्यात सार्वजनिक उत्सवांनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.
नुकतेच केरळमध्ये ओणमनंतर रुग्ण संख्या वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. महाराष्ट्रातही सध्या गणेशोत्सव साजरा होत असून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
बहुतांश नागरिक सध्या मास्क वापरत नसल्याचे चित्र दिसत असून त्यामुळे कोरोना वेगाने फैलावण्याची भीती राज्याचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोरोना नियमांचे योग्यरित्या पालन केल्यास कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्यापासून रोखली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजेशनची काळजी घेणे, मास्कशिवाय प्रवेश न देणे ही खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम