Ahmednagar News : निसर्गाची किमया अनोखी आहे. निसर्गातील काही थक्क करणाऱ्या घटना पाहिल्या की मग कळत निसर्गाची ताकद किती आहे. जर याच ताकदीला वैज्ञानिकांची साथ मिळाली तर?
तर अनेक फायदेशीर परिणाम दिसून येतात. याचच एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील हिवरगाव पावसा येथे घडले आहे.
संगमनेरी शेळीला झाली पाच करडे
राहुरीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्प आहे. या प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी असून या पांढऱ्या शुभ्र असणाऱ्या शेळीने सुदृढ अशी पाच पिल्ले दिली आहेत.
तस जर पाहायला गेलं तर साधारण ७५ टक्के शेळ्यांना एक किंवा दोन करडे होतात. क्वचित अपवादात्मक स्थितीमध्ये शेळ्या तीन, चार करडे होतात. पण ही शेळी यालाही अपवाद ठरली आहे. या शेळीने पाच करडे जन्माला घातली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरु आहेत ‘हे’ प्रयत्न
संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात.
याचाच एक भाग असणाऱ्या हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळ्यांच्या कळपातील दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे आणि एका शेळीने पाच करडे दिली आहेत. हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल.
दरम्यान विद्यापीठाने आजवरच्या प्रयत्नांतून नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या तीन हजारांवरून ५० हजारपर्यंत आणली आहे.
संगमनेरी शेळीचे वैशिष्ट्य
सध्या अनेक तरुण शेळीपालन व्यवसायाकडे वळले आहेत. अनेक ठिकाणी संगमनेरी शेळीला प्राधान्य दिले जाते. संगमनेरी शेळी मांस आणि दूध उत्पादनासाठी जास्त चांगली असते असे मानले जाते. या शेळीचे संगमनेर हे मूळ स्थान असल्याने या जातीचे नाव संगमनेरी असे पडले.
या शेळीची खास ओळख असते ती म्हणजे शिंगे. या शेळीची शिंगे पातळ, टोकदार, तसेच मागे वळलेली आणि वरच्या दिशेने असतात तर काही शेळ्यांना शिंगेच नसतात. यात दोन कलर असतात. पांढऱ्या आणि तपकीरी अशा दोन रंगात या शेळ्या आढळतात.
ही शेळी साधारण १८० दिवस अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देते. यात शेळीचे वजन साधारणपणे ३२ किलोपर्यंत तर बोकडचे वजन ३९ किलोपर्यंत असते.