मृतदेहाची चिरफाड न करताही होणार ‘पोस्टमार्टम’

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi News

Marathi News : ‘क्वाज ऑफ डेथ’ जाणून घेणे हा वैद्यकीय अधिकारी वा पोलीस प्रशासनाच्या कार्यपूर्तीचा भाग असला, तरी संबंधित नातलगांसाठी अत्यावश्यक भाग ठरतो.

प्रचलित ‘पोस्टमार्टम’मधील अनावश्यक विलंब आणि वेदनादायी काळातील मनस्ताप टाळणारी दिलासादायक बातमी हाती आली आहे. मृतदेहाची चिरफाड टाळून आता ‘पोस्टमार्टम’ करणे शक्य होणार आहे. नागपुरात ही सुविधा नजीकच्या भविष्यकाळात उपलब्ध होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील डॉ. अभिषेक यादव यांनी दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये सर्वप्रथम आभासी ‘पोस्टमार्टम’चा प्रकल्प सुरू केला आणि आता प्रत्यक्षपणे त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली आहे.

जगातील काही देशांमध्ये रेडिओलॉजिकल पद्धतीने आभासी ‘पोस्टमार्टम’ करण्याची पद्धत आहे. ही पद्धत खर्चिक असली, तरी मृत्यूचे नेमके निदान व स्वच्छतेसाठी गरजेची आहे. या पद्धतीत चिरफाड न करताही शरीरातील जखमेची अचूक लांबी-रुंदी समजू शकते. छोट्या गोष्टीचाही उलगडा होऊ शकतो.

सध्याच्या पारंपरिक पद्धतीला मर्यादा आहे. आभासी पद्धत ही सिटी स्कॅन वा ‘एमआरआय’ या आजच्या प्रचलित प्रकाराच्या समकक्ष असल्याने मृतदेहाचे वेगवेगळ्या अँगलने स्कॅनिंग शक्य होते. ज्या गोष्टी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीच त्या यात नेमकेपणाने दिसू शकतात. त्यामुळे सखोल चिकित्सा शक्य होते.

स्कॅनिंगनंतर उपलब्ध होणारी माहिती वेगवेगळे तज्ज्ञ अभ्यासू शकतात. जेथे मृत्यू संशयास्पद आहे तेथे ‘पोस्टमार्टम’ आवश्यकच आहे; परंतु जेथे गरज नाही तेथे वेगळी उपाययोजना असली पाहिजे.

मेडिको लीगल केस असल्यास ‘पोस्टमार्टम’ गरजेचे होते. जवळपास ९० टक्के प्रकरणांमध्ये मृत्यूचे कारण माहीत असते; परंतु नियमाचे पालन म्हणून ‘पोस्मार्टम’ केले जाते.

अशा प्रकरणात वेगळा विचार झाला पाहिजे. मृतदेहाची चिरफाड करू नका, अशी आप्तस्वकियांची विनवणी या आभासी पद्धतीमुळे पूर्ण करणे शक्य होणार आहे.

ही प्रक्रिया १० ते १५ मिनिटांत होऊ शकते. त्यामुळे मृतदेह मिळण्यास लागणारा विलंब टाळता येणार आहे. तसेच मृतदेहाची चिरफाड होत नसल्याने दुर्गंधी टाळून परिसरात स्वच्छता राखण्यास मदत मिळणार आहे.

कुठल्याही शासकीय रुग्णालयातील ‘पोस्टमार्टम’ विभागातील दुर्गंधी, भेसूर वातावरण, मृतदेहाच्या प्रतीक्षेत हताशपणे बाहेर बसलेले नातेवाईक असे चित्र सार्वत्रिक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नागपूरच्या ‘एम्स’ने पुढाकार घेतला आहे.

मृतदेहाची चिरफाड न करता आभासी ‘पोस्टमार्टम’ प्रकल्प नागपूर ‘एम्स’मध्ये राबवता येईल का? त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

नागपूर ‘एम्स’मध्ये नव्याने रुजू झालेले कार्यकारी संचालक डॉ. प्रा. प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या साह्याने नव्याने प्रस्ताव तयार करून ‘आभासी पोस्टमार्टम प्रकल्प’ नागपूर ‘एम्स’मध्ये आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे ‘एम्स’ नागपूरचे अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe