802 किलोमीटर लांबीच्या ‘या’ महामार्गासाठी सुरू होणार भूसंपादन ! 86 हजार 300 कोटी रुपयांचा प्रकल्प ठरणार गेमचेंजर, कुठे असणार इंटरचेंज ?

Tejas B Shelar
Published:
Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्यात महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विविध महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घेतले आहे. आता याच महामार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील पवणार येथून सुरू होणारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी बांदा येथे समाप्त होणाऱ्या या महामार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याचाच अर्थ येत्या दोन ते तीन महिन्यात या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

या महामार्गाच्या भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यांमध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या वर्षाअखेरपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित केले आहे. अर्थातच या महामार्गाचे पुढील वर्षात प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या महामार्गाचा संपूर्ण रूट थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार रूट ?

हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे हा मार्ग समाप्त होणार आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार असून बारा जिल्ह्यांमधील 19 देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

सध्या स्थितीला समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे. समृद्धी महामार्गाची लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. मात्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला शक्तिपीठ महामार्ग हा लांबीने समृद्धी महामार्गपेक्षा 101 किलोमीटरने अधिक राहणार आहे.

शक्तीपीठ महामार्ग तयार झाल्यानंतर हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा प्रवेश नियंत्रित महामार्ग बनणार आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी 86 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च होणार असून महामार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी 26 ठिकाणी इंटरचेंज म्हणजेच आंतरबदल राहणार आहेत.

या 12 जिल्ह्यांना जोडणार 

हा मार्ग राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण या विभागांना जोडणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग हे १२ जिल्हे या महामार्गाने जोडले जाणार आहेत. यातून राज्यातील प्रमुख शक्तीपीठे, ज्योतिर्लिंग आणि देवस्थानांना जाण्याचा प्रवास सुखकर होणार अशी आशा राज्य शासनाने व्यक्त केली आहे. 

शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्याचे कारण

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. ते सांगतात की, या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्याचे कारण म्हणजे हा महामार्ग राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तिपीठांना जोडणार आहे.

हा मार्ग राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे अर्धशक्तीपीठ वगळता इतर तीन शक्तीपीठांना परस्परांना कनेक्ट करणार आहे. राज्यातील प्रमुख शक्तीपीठे, ज्योतिर्लिंग आणि इतर प्रमुख देवस्थानांना जोडणारा हा महामार्ग खऱ्या अर्थाने राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देईल अशी आशा आहे.

प्रवासाचा कालावधी वाचणार

सध्या स्थितीला नागपूर ते गोवा असा प्रवास जर करायचा असेल तर प्रवाशांना तब्बल 21 तासांचा प्रवास करावा लागतोय. मात्र हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा हे अंतर कमी होईल आणि प्रवाशांना जलद गतीने या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करता येणे शक्य होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा हा प्रवास फक्त आणि फक्त 11 तासात पूर्ण करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा तब्बल दहा तासांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe