Ahmednagar Politics : मतदान झाले, आता विखे की लंके? मतदार हुशार, अंदाज चुकवणार ! एकंदरीत मतदानानंतर कोण होईल ‘राजा’? पहा..

Ahmednagarlive24 office
Published:
lanke

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी देखील निवडणुका काल (दि. १३ मे) पार पडल्या. जवळपास ६१ टक्के मतदान झाले. हा सामना लंके-विखे असा असल्याने तो सुरवातीपासूनच चुरशीचा ठरला होता.

काल अखेर या जागेसाठी मतदान पार पडले. या मतदारसंघात महायुतीकडून खासदार डॉ. सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके यांसह सर्व मिळून २५ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची होती. त्यामुळे नेमके कोण विजयी होणार, असे अंदाज बांधणे बहुतेकांना अवघड झाले.

अगदी काल सायंकाळपर्यंत विखे की लंके? अशाच चर्चा व फिक्स सांगणे फार कठीण आहे अशी उत्तरे इतकंच ऐकायला मिळत होते.

यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी …
डॉ. विखे पाटील व लंके यांनी गेल्या अडीच वर्षांपासून जोरदार तयारी सुरू केली होती. ही निवडणूक यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी ठरली. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानाला येत होते. यापूर्वी कोणत्या भागात किती महिला-पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला, यावरून अनेकजण कोणता उमेदवार विजयी होणार, याचा अंदाज बांधत होते.

तथापि, या वेळी हे अंदाजही बांधणे अवघड झाल्याचे नागरिकांच्या बोलण्यातून जाणवले. आता मतदार हुशार झाले आहेत. कोणाला मते द्यायची, हे त्यांना सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया युवक बोलून दाखवित होते.

विखे यांची गणिते कोठे जुळू शकतात व कोठे फिस्कटू शकतात?
तस जर पाहिले तर दोघांसमोरही अनेक आव्हाने व अनेक वीक पॉईंट होते. एकीकडे खा. सुजय विखे यांची यंत्रणा तगडी होती. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांची यादीही होती. तसेच महत्त्वाचे म्हणजे मोदी फॅक्टर हे देखील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणारे होते.

मातब्बर नेते मंडळींशी असणारी विखे यांची सलगी ही देखील त्यांना फायदेशीर ठरेल. अजित पवारांच्या दोन्ही सभेने काहीसे वातावरण बदलेले दिसले. हे देखील महत्वाचा विषय विखे यांच्या पाठीशी राहिला. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री असणे व त्यांची जिल्ह्यावर पकड असणे ही देखील एक बाजू या निवडणुकीत महत्वपूर्ण ठरणार आहे.

तसेच विखे घराण्याने आजवर केलेलं सुसंस्कृत राजकारण हे देखील एक जमेची बाजू. तसेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या प्रमाणे निलेश लंके यांचे राजकीय काळात जे काही राजकीय शत्रू बनले ते विखे यांनी एकत्रित करत मूळ पारनेरमध्येच मताधिक्य मिळेल या दृष्टीने त्यांची पेरणी केली. ते देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरेल.

आ. संग्राम जगताप, माजी आ. शिवाजी कर्डीले यांनी देखील प्रामाणिक काम केल्याचे दिसून आले व हे देखील नगर शहर व तालुक्यातून मताधिक्य देऊ शकते असेही म्हटले जात आहे. आता ह्या झाल्या जमेच्या बाजू. पण काही बाजू अशा होत्या की त्याने गणिते फिस्कटू शकतात. विखे यांची कामे जरी असली तरी जनसंपर्क कमी आहे अशी ओरड सातत्याने होताना दिसली व विरोधकही हे रुजवण्यात काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.

तसेच ऐनवेळी झालेली कांद्याची निर्यातबंदी व दुधाचे भाव कोसळणे या देखील गोष्टी गणिते बिघडवणाऱ्या ठरू शकतात असे लोक म्हणतात. तसेच इतर मंडळी हाताशी धरताना पक्षांतर्गत असणारी काहीशी नाराजी ही देखील डोखे दुखी ठरवणारी होऊ शकते.

तसेच ठरावीक एक समाजाची मते पूर्ण विरोधात जाण्याची भीतीही विखे समर्थक व्यक्त करत आहेत. आणखी एक म्हणजे पक्षफुटीनंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबाबदल जनतेत असणारी सहानुभूतीची लाट. याचाही परिणाम काहीसा मतावर होऊ शकतो असे म्हटले जाते.

लंके यांची गणिते कोठे जुळू शकतात व कोठे फिस्कटू शकतात?
दुसरीकडे निलेश लंके यांच्यासाठी देखील अनेक जमेच्या बाजू होत्या. त्यांचा असणारा दांडगा जनसंपर्क हीच त्यांची पहिली जमेची बाजू. त्यानंतर त्यांनी लोकांना दिलेला वेळ, गावागावातील विविध मंडळांशी असणारी सलगी हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. थेट जनतेत जाणे व त्यांच्याशी संपर्क ठेवणे हे पवार साहेबांचे सूत्र त्यांनी अमलात आणल्याने त्याचा फायदा त्यांना होईल.

तसेच वाढती महागाई, कांदा, दूध प्रश्न, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबाबदल जनतेत असणारी सहानुभूती या गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडतील असेही म्हटले जाते. तसेच एक ठराविक गट की जो भाजपच्या विचारांना विरोध करतो त्याचे होणारे एकगठ्ठा मतदान या गोष्टी लंके यांच्या फायद्याच्या राहतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळात केलेलं काम या बाबत एक सॉफ्ट कॉर्नर लोकांच्या मनात जाणवत होता.

आता त्याचे मतात किती रूपांतर होईल माहिती नाही पण ती एक त्यांच्या मतदानात वाढ करून देणारी गोष्ट ठरू शकते असाही एक अंदाज आहे. आता ह्या झाल्या जमेच्या बाजू. पण काही बाजू अशा होत्या की त्याने गणिते फिस्कटू शकतात. त्यांना स्वतःच्या मतदार संघामध्येच आवाहने पाहायला मिळाली.

उदा. माजी नगराध्यक्ष विजय औटी. असे अनेक विरोधक असल्याने त्याचा फटका बसू शकतो. तसेच त्यांची काही विधाने ही देखील वादाची विषय ठरली. त्याचाही फटका बसू शकतो असे लोक म्हणतात. तसेच महायुतीची ताकद मोठी असल्याचे लोक म्हणतात जर तसे असले तर त्याचाही फटका त्यांना बसू शकतो.

मतांची आकडेवारी
मागील वेळपेक्षा यंदा कमी मतदान झाले. टक्केवारी थोडीफार मागील वेळपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. तसेच काही तालुक्यांत मतांची टक्केवारी विधानसभेपेक्षा जास्त दिसली. उदा. राहुरी, शेवगाव. त्यामुळे घसरलेला थोडासा टक्का, व काही तालुक्यातील वाढलेली आकडेवारी ही कुणासाठी फायदेशीर ठरू शकते हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे.

कोण निवडून येईल?
एकंदरीतच वरील सर्व फॅक्टर जर पाहिले तर या निवडणुकीत मात्र सर्व गणिते बदलली. डॉ. विखे व लंके दोन्ही उमेदवारांना प्रचारात मोठी कसरत करावी लागली. मोठ्या नेत्यांच्या सभा घेण्याची वेळ आली. घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य उमेदवार, असे या निवडणुकीला स्वरूप आले.

मातब्बर नेते विरुद्ध सामान्य कार्यकर्ते, अशी प्रचाराला स्वरूप आले होते. आता वरील सर्व फॅक्टर पाहता मतदार हुशार असून सर्वांचे अंदाज चुकवणार असा एक सूर निघत असून येणार निकाल सर्वांसाठीच धक्कदायक असेल असेही म्हटले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe