Bhuimug Lagwad 2025 : शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसांनी भुईमूग लागवडीला सुरुवात होणार आहे. जानेवारीचा पहिला पंधरवडा हा लवकरचं संपणार अन उन्हाळी हंगामातील भुईमूग पेरणीला सुद्धा सुरुवात होणार आहे. 15 जानेवारी पासून उन्हाळी हंगामातील भुईमूग लागवडीला सुरुवात होईल, अशी माहिती कृषी तज्ञांनी दिली.
आपल्या राज्यात जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली जाते. भुईमूग हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक, आधी या तेलबिया पिकाची लागवड आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात होत होती मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये भुईमुगाचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.
सोयाबीन, सूर्यफूल, करडई मोहरी अशा विविधतेलब्या पिकांचे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे पण भुईमुगाची लागवडखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कारण म्हणजे भुईमूग पिक उत्पादित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च येतो आणि त्या तुलनेने उत्पन्न मिळत नाही. भुईमुगाचे क्षेत्र कमी होण्यामागे मजूर टंचाई देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
पण जर भुईमूग पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळाले तर नक्कीच शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होईल आणि यामुळे याचे लागवडीखालील क्षेत्र सुद्धा वाढणार आहे. म्हणूनच आज आपण उन्हाळी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असणाऱ्या भुईमुगाच्या टॉप 3 जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भुईमुगाचे टॉप 3 वाण अन त्यांच्या विशेषता जाणून घ्या
पहिला वाण एस. बी. ११ : भुईमुगाचा हा वाण उपट्या प्रकारातील आहे. या जातीची खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवड करता येणे शक्य आहे. खरीप हंगामात लागवड केल्यास पीक पेरणीनंतर साधारणता 105 ते 110 दिवसात आणि उन्हाळी हंगामात लागवड केल्यास साधारणतः 115 ते 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
खरीप हंगामात 12 ते 15 क्विंटल आणि उन्हाळी हंगामामध्ये 15 ते 20 क्विंटल एवढे उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केलाय. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सर्वचं जिल्ह्यांमध्ये या जातीची लागवड करता येणे शक्य आहे. उन्हाळी हंगामात लागवड करायची असेल तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात करावी.
दुसरा वाण फुले ६०२१ : या जातीला आर एआरजी- ६०२१ असं म्हणतात. हा निमपसरी प्रकारातील वाण आहे. याची लागवड फक्त उन्हाळी हंगामात केली जाऊ शकते. याची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात करावी. या जातीचे पीक 120 ते 125 दिवसात तयार होते आणि या जातीपासून 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीची पश्चिम महाराष्ट्रात लागवड करता येणे शक्य आहे.
तिसरा वाण फुले उन्नती : हा उपट्या प्रकारातील वाण असून संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे. खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामांमध्ये याची लागवड करता येणे शक्य आहे. जर खरीप अर्थातच पावसाळी हंगामात लागवड केली तर या जातीचे पीक 110 ते 115 दिवसात तयार होते आणि यापासून 25 ते 30 क्विंटल एवढे उत्पादन मिळते.
जर उन्हाळी हंगामात लागवड केली तर या जातीचे पीक 120 ते 128 दिवसात तयार होते आणि 35 ते 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीची संपूर्ण महाराष्ट्रात लागवड करता येणे शक्य आहे.