इलेक्ट्रीकल फिटिंग व प्लंबिंग व्यवसायाला आले ‘अच्छे दिन’ ; परप्रांतीय कामगारही कार्यरत

Sushant Kulkarni
Published:

२४ जानेवारी २०२५ सुपा : ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक घरांचे बांधकाम केले जात असल्याने इलेक्ट्रीशियन व प्लंबर्सना मागणी वाढली आहे.या दोन्ही व्यवसायात आतापर्यंत स्थानिक कामगारांचा वरचष्मा होता; परंतु वाढती मागणी व दिवसाकाठी ७०० ते एक हजार रुपयांपर्यंत मजुरी मिळत असल्याने अनेक तरुण या व्यवसायात उतरत आहेत.स्थानिक तरुणांबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार,या राज्यांतील कामगारही आता या व्यवसायात कार्यरत आहेत.

शहरांसह ग्रामीण भागात इलेक्ट्रिशियन व प्लंबर्सना मागणी वाढत आहे.अनेकवेळा कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.मागणी प्रमाणे पुरवठा करणे शक्य नसल्याने परप्रांतीय कामगार या व्यवसायात उतरल्याचे ठेकेदारांनी सांगितले.या दोन्हीही व्यवसायातील कामगारांपैकी ३० टक्के कामगार परप्रांतीय आहेत.

नामवंत कंपन्यांच्या साहित्य विक्रीतून मोठी उलाढाल होते.चार वर्षांपूर्वी इलेक्ट्रीक साहित्यावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.मात्र, याबाबत विविध संघटानांद्वारे पाठपुरावा करण्यात आल्याने २८ वरून जीएसटी दर कमी करत १८ टक्के आकारण्यात आल्यानंतर इलेक्ट्रिकल व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला.

शहरातील इलेक्ट्रिक फिटिंग व्यवसायात आता ग्रामीण भागातील अनेक तरूण उतरत आहेत.रोजगाराचा एक चांगला पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. मात्र,या क्षेत्रातील कामगारांची संघटना नसल्याने त्यांना त्यांच्या समस्या शासनाकडे प्रभावीपणे मांडता येत नाहीत.

शहरांसह ग्रामीण भागात बांधकाम व्यवसायाचा विस्तार होत असताना इलेक्ट्रिकल फिटिंग व प्लंबिंग व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत.या दोन्ही व्यवसायांमुळे स्थानिक कामगारांबरोबरच परप्रांतीय कामगारांनाही रोजगार मिळत आहे.सध्या इलेक्ट्रिक फिटींग व प्लंबिंग व्यवसायात हजाराहून अधिक कामगार कार्यरत आहेत.दोन्ही व्यवसाय मिळून कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe