अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर असणाऱ्या डोहात बुडून औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर मधुकर दांडाईत (वय-21) या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची समजलेली अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद शहरातील पर्यटक मंगळवारी पर्यटनासाठी हरिश्चंद्रगड परिसरात आले होते.

परंतु गत दोन- तीन दिवसांपूर्वी या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे डोंगर द-यातील ओढे नाले आजुनही खळखळून वाहत आहेत.

तर माथ्यावरील डोहातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ज्ञानेश्वरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान हि घटना घडल्यानंतर तरुणाच्या मित्रानी ज्ञानेश्वरला आपल्या गाडीत टाकून राजूर येथे आणले व राजूर ग्रामीण रुग्णालयात नेले.

मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.