अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. या वाढत्या अपघातांमुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस भर पडते आहे. अशाच एका अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे.

नगरहून सुसरेकडे ता. पाथर्डी चाललेल्या दुचाकीस्वाराला अमरापूरजवळ ता. शेवगाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या युवकाला अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.

संदीप भानुदास मुखेकर वय २८ रा. मुखेकरवाडी कोरडगाव ता. पाथर्डी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान या अपघातातील अज्ञात चालक फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संदीप मुखेकर हे सकाळी १० वाजता नगरहून सुसरे येथे दुचाकीवरून चालले होते. अमरापूरजवळ ता. शेवगाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त गंभीर जखमी झाला.

त्यांना पाथर्डीच्या उप जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. तेथून नगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मुखेकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.