Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली आहे. संजय राऊत तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी गेले होते.

आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मुंबईत ठाकरे गटाकडून मोठा जल्लोष करण्यात आला आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर बॅनर लावण्यात आले आहेत.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर अनके नेत्यांनी त्यांना फोन केले आहेत. मात्र भाजपच्या एका दिल्लीतील बड्या नेत्यानेही संजय राऊत यांना फोन केला होता. तसेच संजय राऊत यांनी फडणवीसांच्या कामाचेही कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपचे नेते नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी फोन केला असल्याचे सांगितले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत आणि भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी या दोघांमध्ये काय बोलणे झाले यावर राऊत यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही. भाजप नेत्याचा फोन आणि फडणवीसांच्या कामाचं कौतुक यामुळे राज्यात वेगळीच चर्चा रंगली आहे.

राऊत यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे सांगितले. आपल्यासोबत काय करण्यात आले याची माहिती देणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.