अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात सोयाबीन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे बळीराजावर नवीनच संकट ओढावले आहे. नुकतेच जामखेड तालुक्यातील मुंगेवाडी येथील शेनपट्टी शिवारात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सोयाबीन चोरटयांनी चोरून नेले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, येथील शेतकरी विठ्ठल गोपाळघरे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, खळ्यावर केलेले पंचवीस किंटल सोयाबीन तीस गोण्यांमध्ये झाकून ठेवले होते.

परंतु याच गोष्टीचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन रातोरात एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सोयाबीन चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर गोपाळघरे यांनी खळ्यावर जाऊन पाहिले असता सोयाबीन चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने सोयाबीन काढून झाल्यानंतर आर्थिक उत्त्पन्न सोयाबीन विकल्यानंतर त्यांना मिळणार होते. परंतु चोरट्यांनी गोण्या भरून ठेवलेल्या सोयाबीनवर डल्ला मारल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

या झालेल्या चोरीचा तपास करून विठ्ठल गोपाळघरे या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.