अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- अवघ्या जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंतीदिनी संगमनेरमध्ये स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चुन अवैध कत्तलखाने सुरु होते.

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्हा पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यानंतर हा प्रकार समोर आला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून ४ लाख २८ हजार रुपयांची रोकड देखील जप्त केली आहे.

राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. शनिवारी रात्री सुरू करण्यात आलेली ही कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरू होती, तर दुपारी उशिरापर्यंत कारवाईतील मुद्देमालाची तपासणी सुरू असल्याने उशिरापर्यत गुन्हा दाखल झालेला नव्हता. कारवाईत ७१ जिवंत गोवंश जनावरांना जीवदान मिळाले.तर तब्बल ३१ हजार किलो गोमांस कारवाईत आढळुन आले आहे.

याशिवाय कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणारी वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी दोघेजन ताब्यात घेतले असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संगमनेरातील कत्तलखाने राज्यात प्रसिद्ध आहेत.

येथील कत्तलखान्यातून राज्यभरात गोमांस पुरविले जाते; मात्र स्थानिक पोलीस अपवाद वगळता या कत्तलखान्यावर कारवाई करतांना आढळत नाही. तत्कालिन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या कत्तलखान्यावर सर्वप्रथम कारवाईचे धाडस दाखविले होते.

त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत २०० जिवंत जनावरांची सुटका करण्यात आली तर हजारो किलो गोमांस ताब्यात घेण्यात आले होते. राज्यातील ती सर्वात मोठी कारवाई ठरली होती. त्यापाठोपाठ रविवारची कारवाई मोठी ठरली आहे.