अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- आयसीसी टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजन झाली आहे. काल न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

या सामन्यामध्ये भारताचे खेळाडू खूप थकलेले दिसत होते. सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. अनेकदा तुम्हाला विश्रांतीची गरज असते. सध्या आमचे शरीर थकले आहे. आम्हाला आरामाचा गरज आहे, असे जसप्रीत बुमराहने म्हटले आहे.

जसप्रीत बुमराहने जे विधान केले आहेत, त्यामध्ये काही तथ्य असल्याचे दिसत आहे. कारण भारत जानेवारीपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. टी-२० विश्वचषकातील जवळपास सर्व खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळून थेट स्पर्धेत उतरले होते.

भारताचा वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहने सांगितले की, अनेकदा तुम्हाला तुमच्या कुटुंबीयाची आठवण येत असते. आम्ही जवळपास सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळत आहोत, तसेच घरापासून दूर आहोत. त्यामुळे या गोष्टी तुमच्या डोक्यात येतात.

बीसीसीआयने याबाबत शक्यतोपरी प्रयत्न केले. मात्र जेव्हा तुम्ही कुटुंबापासून दूर बायो-बबलमध्ये खूप वेळ घालवता तेव्हा अशा गोष्टी डोक्यात नक्कीच येतात. तसेच बायोबबलमध्ये सातत्याने राहिल्यामुळे खेळाडू मानसिक दृष्ट्याही थकतो. गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळत आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर १५ दिवसांच्या आत भारताची इंग्लंडसोबतची मालिका सुरू झाली होती. दोन्ही संघांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मिळून कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० सामने खेळले होते.

त्यानंतर आयपीएलला सुरुवात झाली होती मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने आयपीएल स्थगित करण्यात आली होती. नंतर जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला होता. तेव्हापासून भारतीय संघ देशाबाहेर आहे.