अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- नित्यनेमाप्रमाणे तो भल्या पहाटेच आटोपून भाजी खरेदी करण्यासाठी निघाला.

मात्र आज आपल्या सोबत काहीतरी भलतंच घडेल असे त्याच्या ध्यानीमनी नसताना अचानक समोर आलेल्या तिघांनी त्याच्यावर थेट कोयत्याने सापसप वार केले अन त्याच्या गळ्यातील अडीच लाखांची सोन्याची चैन घेवून गेले.

ही अंगावर शहारे आणणारी घटना नगरमध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, चितळे रोडवरील भाजी विक्रेते संतोष उर्फ बाळासाहेब नारायण तरोटे हे सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. १६ बीडब्ल्यू ९०) भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डला जात होते.

ते कोर्टगल्ली येथे आले असता पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी तरोटे यांची कॉलर ओढून त्यांना खाली पाडले.

नंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली. या झटापटीत एकाने तरोटे यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले.

याबाबत तरोटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.