अहिल्यानगर जिल्ह्यातील गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवू, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचा हल्लाबोल

Published on -

केडगाव : उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी सोडले, पण तरीही ठाकरे गट मजबूत राहिला. मग नगर तालुक्यातील पाच लोकांनी गट सोडल्याने कोणताही फरक पडणार नाही.

उलट आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अशा गद्दारांना जागा दाखवू, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केला. त्यांनी शिंदे गटात गेलेल्या माजी सहकाऱ्यांवर नाव न घेता जोरदार टीका केली.

नगर तालुक्यातील ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर यांच्यासह पाच जणांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

या पार्श्वभूमीवर नगर येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी प्रा. गाडे यांनी गटत्याग करणाऱ्यांवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.

गाडे म्हणाले, “नगर तालुक्यात गद्दारांना पक्ष सोडायचाच होता, फक्त त्यांना कारणे हवी होती. त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे त्यांनी गद्दारी केली.

ते मुंबईला प्रवेशासाठी गेले, तेव्हा त्यांच्यासोबत फक्त तीन गाड्या होत्या. मी स्वतः कार्ले यांना जिल्हाप्रमुख पद द्यायची तयारी दाखवली होती. पण त्यांनी घरच्यांना विचारतो असे सांगून वेळ मारून नेली आणि अखेर पक्ष सोडला.

एवढ्या जबाबदाऱ्या देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. आता निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी निवृत्त होणार नाही!”

नागरदेवळे गटात शरद झोडगे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. लोकांची नाराजी असतानाही मी स्वतः गावागावात प्रचार केला.

पण त्यांनीही पक्षाशी गद्दारी केली. मुळात झोडगे कधीच पक्षाशी एकनिष्ठ नव्हते, अशी जोरदार टीका गाडे यांनी केली.

गाडे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की, “संघटना मजबूत करून आगामी निवडणुकीत ताकद दाखवू. मागच्याप्रमाणेच यावेळीही विजय मिळवून दाखवू!”

यावेळी जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव, माजी सभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, गोविंद मोकाटे, पोपट निमसे, रा. वी. शिंदे, रती वाकळे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रवीण गोरे, सरपंच विक्रम गायकवाड, निसार शेख, जीवा लगड, रघुनाथ झिने आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!