अहिल्यानगर मार्केट यार्डमध्ये एकाच रात्री ८ दुकाने फोडणाऱ्या सराईत चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Updated on -

अहिल्यानगर- मार्केट यार्डमधील भुसार विभागातील ८ दुकाने फोडून चोरी करणारे दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. या चोरट्यांकडून मार्केट यार्ड सह साकत व देहरे गावात मेडिकल दुकानांत केलेल्या चोऱ्याही उघड झाल्या आहेत.

अकबर लुकमान खान (वय ३३, रा.दौला वडगाव, ता. आष्टी, जि.बीड), आर्यन पप्पु शेख (वय १९, रा.दौलावडगाव, ता. आष्टी, जि.बीड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर समीर बालम शेख (रा.मुकुंदनगर, अहिल्यानगर) हा पसार झाला आहे.

मार्केट यार्डमधील भुसार विभागातील ८ दुकाने २ जुलै रोजी चोरट्यांनी फोडून चोरी केली होती. याबाबत संजय चुनिलाल लुनिया (वय ६१, रा. आनंदधाम, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, शाहीद शेख, मयुर गायकवाड, रविंद्र घुंगासे, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमून समांतर तपास सुरु केला होता. सदर पथक गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्हयाचा तपास करत असताना ३ जुलै रोजी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अकबर लुकमान खान व त्याचे साथीदारांनी केला असून ते मोटार सायकलवर राधाबाई काळे महिला महाविदयालय परिसरात येणार आहेत.

ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ नमूद ठिकाणी सापळा रचुन संशयीत आरोपीचा शोध घेत असताना संशयीत आरोपी अकबर लुकमान खान व आर्यन पप्पु शेख यांना पकडले तर समीर बालम शेख हा पसार झाला. ताब्यातील आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी मार्केट यार्ड मधील दुकानांत चोरी केल्याची कबुली दिली. ४-५ दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील साकत व मागील दोन महिन्यापुर्वी देहरे येथील मेडीकल दुकानाचे पत्रे उचकटून चोरी केल्याची माहिती सांगीतली. आरोपीने दिलेल्या माहितीवरून खालीलप्रमाणे ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!