डोक्यावर ५ किलोची गाठ… डॉक्टरांनी केला चमत्कार ! तरुणाला साई हॉस्पिटलमधून मिळाले दुसरे जीवन

Published on -

Shirdi News : डोक्यावर अवाढव्य गाठ घेऊन जगत असलेल्या एका तरुणाच्या जीवनात शिर्डी संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नवचैतन्य आणले. अनेक हॉस्पिटल्सनी नाकारलेली शस्त्रक्रिया येथे यशस्वीरित्या पार पडली आणि रुग्ण पुन्हा नवजीवन जगू लागला. ही वैद्यकीय सेवा केवळ उपचार नव्हे, तर एक सामाजिक योगदान ठरली.

अनिकेत भानुदास इंगळे (वय २१, रा. चत्तरी, ता. पातुर, जि. अकोला) या तरुणाच्या डोक्यावरील जन्मजात लहानशी गाठ वाढत जाऊन तब्बल ४.९ किलो वजनाची झाली होती. या गाठीने रुग्णाच्या डोक्यावर जणू काही डोंगरच आलेला होता. इतकी मोठी गाठ लांबूनही सहज दिसत होती आणि ती त्याच्या सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत होती.

अनेक वर्षांपासून या गाठीसह जगणाऱ्या अनिकेतची स्थिती पाहता, त्याच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी शत्रक्रिया करण्यास नकार दिला. अनेक नामांकित रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही कोणीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते.

शेवटी अखेरच्या आशेने अनिकेतने शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांनी अनिकेतची सखोल तपासणी केली आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा धाडसी निर्णय घेतला.

संभाव्य धोका स्वीकारत रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांनी सहमती दिली. दि. २५ जून रोजी, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ज्ञ डॉ. निहार जोशी आणि त्यांच्या सर्जरी टीमने अथक प्रयत्न करत, ३० बाय २.५ सेंमी आकाराची आणि ४.९ किलो वजनाची गाठ रुग्णाच्या डोक्यावरील एकाच वेळी पूर्णपणे काढून टाकली.

रुग्णाच्या जीवाला कोणताही धोका न होता ही गुंतागुंतीची व दुर्मिळ शत्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच पार पडली असून, हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमच्या समन्वयामुळे ती यशस्वी झाली, असे डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांनी सांगितले.

रुग्ण सुखरूप घरी परतला !

श्री साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे स्थान नसून, आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत आहे. रुग्ण आता पूर्णपणे बरा असून, सुखरूप घरी परतला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाचे आभार मानले आहेत.

शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत

ही संपूर्ण शस्त्रक्रिया हॉस्पिटलने पूर्णपणे मोफत केली आहे. या यशस्वी उपचाराबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल (से.नि.) डॉ. शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, न्यूरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे आदींनी डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या संपूर्ण टीमचा नुकताच सन्मान केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!